नवनिर्वाचित सदस्यांशी संवाद साधत निवड प्रक्रियेबाबत मार्गदर्शन
कोल्हापूर – कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या उद्या (दि. 17) होणाऱ्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे सर्व जिल्हा परिषद सदस्य आज पन्हाळा येथे एकत्र आले. आगामी निवड प्रक्रियेबाबत चर्चा करत रणनीती ठरविण्यात आली.
महायुतीचे घटक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पक्ष, शिवसेना, जनसुराज्य शक्ती पक्ष आणि शाहू आघाडीचे मिळून एकूण ५१ जिल्हा परिषद सदस्य या बैठकीस उपस्थित होते. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील-आसुरलेकर, जिल्हा बँकेचे संचालक प्राचार्य अर्जुन आबिटकर तसेच शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय बलुगडे यांनी नवनिर्वाचित सदस्यांशी संवाद साधत निवड प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले.
बैठकीत उद्या होणाऱ्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडप्रक्रियेची सविस्तर माहिती देण्यात आली. सकाळी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदांसाठीची नावे निश्चित करण्यात येणार असून त्यानंतर दुपारी महायुतीचे सर्व सदस्य पन्हाळ्यावरून एकत्रितपणे निवड सभेसाठी कोल्हापूरकडे रवाना होणार आहेत. महायुतीकडे असलेल्या स्पष्ट बहुमताच्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड ही केवळ औपचारिकता उरली आहे, अशी भावना यावेळी उपस्थित सदस्यांनी व्यक्त केली.


















































