शहरातील सर्व गुंठेवारी प्रकरणे नियमित करणार – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

कोल्हापूरकरांना मोठा दिलासा; साडेपाच हजार प्रकरणांना मिळणार न्याय… प्रभाग क्रमांक १९ मधील विविध वसाहतींमध्ये नागरिकांशी थेट संवाद…

कोल्हापूर प्रतिनिधी (विनायक जितकर) – कोल्हापूर शहरातील वर्षानुवर्षे प्रलंबित असलेली गुंठेवारीची समस्या आता कायमस्वरूपी मार्गी लागणार असल्याचे स्पष्ट संकेत पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक १९ मधील रामानंदनगर दत्तनगर, गुलाब नगर, जगताप नगर, रायगड कॉलनी, ऑक्सिजन पार्क, जरग नगर, जाधव पार्क, बालाजी पार्क, महाडा कॉलनी, हनुमान नगर, गणेश कॉलनी, राजीव गांधी नगर आदी परिसरात त्यांनी नागरिकांच्या गाठीभेटी घेतल्या. यावेळी झालेल्या कोपरा सभा, घराघरांतील संवाद आणि नागरिकांच्या प्रश्नोत्तरातून गुंठेवारीचा मुद्दा केंद्रस्थानी राहिला.

रामानंदनगर येथे झालेल्या कोपरा सभेत बोलताना पालकमंत्री आबिटकर म्हणाले की, राज्य शासनाने ३१ डिसेंबर २०२० पर्यंत अस्तित्वात असलेल्या गुंठेवारी वसाहती नियमित करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. मात्र, या निर्णयासंदर्भात स्पष्ट मार्गदर्शक सूचना उपलब्ध नसल्याने जिल्हा प्रशासन आणि महापालिका स्तरावर निर्णय प्रक्रिया खोळंबली होती. यामुळे कोल्हापूर शहरातील सुमारे साडेपाच हजार गुंठेवारी प्रकरणे आजही प्रलंबित आहेत. ही महत्त्वाची अडचण लक्षात घेऊन महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुंठेवारी नियमितीकरणाबाबत नव्याने सुस्पष्ट आणि सर्वसमावेशक मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. या सूचनांची अंमलबजावणी तातडीने व्हावी यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना स्पष्ट आदेश दिले आहेत. त्यामुळे कोणत्याही लाभार्थ्यावर अन्याय होणार नाही. पात्र असलेली सर्व गुंठेवारी प्रकरणे टप्प्याटप्प्याने, पण निश्चितपणे नियमित केली जातील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ते पुढे म्हणाले की, गुंठेवारी प्रकरणे नियमित झाल्यानंतर संबंधित भागांतील नागरिकांना मूलभूत नागरी सुविधा उपलब्ध करून देणे सुलभ होणार आहे. पाणीपुरवठा, ड्रेनेज, रस्ते, वीज, पथदिवे, कचरा व्यवस्थापन, अग्निशमन सुविधा यांसारख्या सोयी अधिकृतरीत्या देता येतील. त्यामुळे या वसाहतींचा सर्वांगीण विकास साधता येईल आणि नागरिकांचे जीवनमान उंचावेल.

यावेळी पालकमंत्र्यांनी संबंधित प्लॉटधारकांना स्पष्ट सूचना केल्या की, गुंठेवारी नियमितीकरणासाठी आवश्यक असलेले अर्ज, खरेदी-विक्री करार, ताबा दर्शविणारी कागदपत्रे, कर पावत्या आदी सर्व माहिती महापालिकेकडे तात्काळ सादर करावी. “नागरिकांनी सहकार्य केल्यास प्रशासनालाही प्रक्रिया जलद आणि पारदर्शक पद्धतीने पूर्ण करता येईल,” असे त्यांनी नमूद केले. महायुतीच्या प्रचारादरम्यान नागरिकांनी स्थानिक प्रश्न, पायाभूत सुविधांची मागणी, रस्ते दुरुस्ती, पाणीटंचाई, ड्रेनेज समस्या आदी बाबी मांडल्या. त्यावर बोलताना पालकमंत्री आबिटकर यांनी महायुतीचे महापालिकेत सशक्त नेतृत्व आले तर शहराच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. कोल्हापूरच्या पुढील पन्नास वर्षांच्या विकासाचा विचार करून महायुतीला संधी द्या,” असे आवाहनही त्यांनी केले. या वेळी महायुतीचे उमेदवार राहुल चिकोडे, मानसी लोळगे, रेणू माने, विजयसिंह खाडे पाटील, डॉ. नीटूरकर, अमर गुरव, तुषार पाटील, अमर तोडकर, ओमकार पाटील, संजय पाटील, शाहू पाटील, सिद्धेश भोसले, पांडुरंग पाटील, संगीता तोडकर, माधुरी हांडे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

कोल्हापूरचा विकास साधणे होणार शक्य

३१ डिसेंबर २०२० पूर्वीच्या सर्व पात्र गुंठेवारी प्रकरणांचे नियमितीकरण करण्यात येणार असून त्यामुळे शहरातील सुमारे ५,५०० प्रलंबित प्रकरणांना दिलासा मिळणार आहे. महसूल मंत्र्यांकडून निर्गमित करण्यात आलेल्या नव्या व सुस्पष्ट मार्गदर्शक सूचनांनुसार तातडीने अंमलबजावणी केली जाणार असून जिल्हाधिकारी व महापालिका प्रशासनाला याबाबत स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. नियमितीकरणानंतर घरांना कायदेशीर मान्यता मिळून पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, वीज व इतर नागरी सुविधा देणे शक्य होणार आहे. कोणत्याही पात्र लाभार्थ्यावर अन्याय होणार नाही, असा विश्वास देत नियोजनबद्ध, कायदेशीर व सर्वसमावेशक कोल्हापूरकडे वाटचाल सुरू असल्याचा स्पष्ट संदेश पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी यावेळी दिला आहे.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.