साैजन्य- फारुक बागवान– सहायक संचालक विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर.
रेशीम म्हटले की, रेशीमांच्या रेघांनी, लाल काळ्या धाग्यांनी कर्नाटकी कशिदा मी काढीला… ही लावणी नजरेसमोर येते. रेशीम वस्त्रे म्हणजे घरंदाज स्त्रियांच्या, उच्चभ्रू स्त्रियांच्या राहणीमानाचे प्रतिक (स्टेटस सिंबॉल) हेच रेशीम जर सामान्यांच्या हाती आले तर…? होय आता ते शक्य आहे…! ही कहाणी आहे कोल्हापूर जिह्यातील शाहूवाडी तालुक्यातील एका गावाची…
राज्यातील काही गावांना एक स्वतंत्र अशी राजकीय, ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक, प्रादेशिक ओळख असते. पैठणी म्हटले की, महाराष्ट्रातील नाशिकचे ‘येवला’ गाव, पुस्तकांचे गाव म्हटले की, सातारा जिल्ह्यातील ‘भिलार’ तर मधाचे गाव म्हटले की, कोल्हापूरातील ‘पाटगाव’ असो किंवा विधवांना संपूर्ण देशात एक वेगळी सन्मानजनक ओळख निर्माण करुन देणारे ‘हेरवाड’ गाव असो. या देदीप्यमान परंपरेत आणखीन एका वेगळ्या नावाची भर पडली. हे गाव म्हणजे, जंगल रेशीमचे गाव – मौजे ऐनवाडी-धनगरवाडी.
सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये शाहूवाडी तालुक्यातील एक अतिशय दुर्गम व डोंगराळ गाव म्हणजे ऐनवाडी- धनगरवाडी. या गावासह डोंगराळ व वन्य भागात राहणाऱ्या लोकांची शाश्वत विकासाची संकल्पना खा. धैर्यशील माने यांच्या संकल्पनेतून पुढे आली तसेच उपजिविका तज्ज्ञ टसर (वन्य) रेशीम प्रकल्पाचे अभ्यासक डॉ. योगेश फोंडे यांच्या संशोधनातून कोल्हापूर जिल्ह्यातील ‘ऐन’ वृक्षांची मुबलक संख्या विचारात घेवून याची निवड करण्यात आली.
टसर (वन्य) रेशीम वैशिष्ट्ये
* कोल्हापूर जिल्ह्यातील बारापैकी आठ तालुक्यांमध्ये ‘ऐन’ वृक्षांची संख्या मोठ्या प्रमाणावर
* ‘ऐन’ वृक्षांची पानेच हे टसर अळीचे खाद्य असल्याने इतर कोणतेही नुकसान नाही
* केवळ 2 महिन्यांच्या कालावधीतच रेशीम कोषांची निर्मिती
* रोहयोअंतर्गत ‘ऐन’ वृक्षांची लागवड करता येते.
* टसर रेशीम कोष, धागा व कापड उद्योगातून मोठ्या प्रमाणावर आर्थिक सक्षमीकरण
* यामध्ये कोणत्याही स्वरुपाची आर्थिक गुंतवणूक नाही
* वन्य प्राण्यांपासून ऐन वृक्ष व टसर अळीला कोणताही धोका नाही
* पाण्याची, नांगरणीची औषध फवारणीची तसेच इतर कोणत्याही देखभालीची आवश्यकता नाही
* जंगल भागातील शेतकरी, महिला व युवकांसाठी नाविन्यपूर्ण व शाश्वत रोजगार
* महत्वाचा फायदा म्हणजे यामुळे पश्चिम घाटातील जैवविविधता वाढण्यास निश्चित स्वरुपात मदत होणार आहे.
कोल्हापूर वनविभाग, वनपरिक्षेत्र मलकापूर यांच्या टसर (वन्य) रेशीम-शाश्वत रोजगार व वनसंवर्धन प्रकल्पांतर्गंत रोजगाराच्या दिशेने एक आश्वासक पाऊल पुढे पडले. नुसतेच रोजगाराच्या दिशेने नाही तरी वन संवर्धनाच्या दृष्टीनेही याचा उपयोग होतो आहे.कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी, पन्हाळा, गगनबावडा, भुदरगड, आजरा, चंदगड, राधानगरी आणि गडहिंग्लज या तालुक्यामध्ये ऐन वृक्षांची संख्या मोठ्या प्रमाणांवर उपलब्ध असल्याने टसर रेशीम उत्पादन हा व्यवसाय न राहता तेथील स्थानिक जनतेसाठी ‘उद्योग’ म्हणून पुढे येईल यात शंका नाही.
‘टसर रेशीम उद्योग’ ही नाविन्यपूर्ण संकल्पना असली तरी स्थानिक रहिवाश्यांना आर्थिक स्त्रोतांच्या अनुषंगाने ती आवडली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील जंगल भागात येणाऱ्या 400 गावांचे मुख्य परिक्षण व विस्तार केंद्र, रेशीम कोष, खरेदी-विक्री, धागा निर्मिती, कापड निर्मिती, अंडी पुंज निर्मिती, कोष प्रक्रीया आणि ‘ऐन’ वृक्ष लागवड योजना केंद्र यांच्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्ह्याची ‘जंगल रेशीमचा जिल्हा’ म्हणून वेगळी ओळख निर्माण झाल्यास आश्चर्य वाटायला नको…!
टसर (वन्य) रेशीम शेतीला ‘वन्य रेशीम शेती’ असेही म्हटले जाते. आदीवासी समुदायासाठी राज्यातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर आदी जिल्ह्यात ‘टसर रेशीम उद्योग’ हे रोजगाराचे प्रमुख स्त्रोत ठरले आहे. सह्याद्रीच्या दऱ्या खोऱ्यांमध्ये शाश्वत विकास साधण्यासाठी हा प्रकल्प महत्वपूर्ण आहे.
स्थानिक ग्रामस्थ- वन्य क्षेत्रात स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी वनविभागाच्या सहाय्याने सामाजिक संस्था काम करत आहेत. निसर्गाची कोणतीही हानी न होता उलट निसर्गाला पूरक असे टसर रेशीमसह विविध प्रकल्प राबविले जाऊ शकतात. ऐनवाडी – धनगरवाडीत हा उपक्रम राबविताना प्रारंभी अडचणी आल्या. मात्र आता स्थानिकांना हक्काचे काम मिळण्यास मदत होईल. मात्र आता स्थानिकांचा हक्काचे काम मिळण्यास मदत होईल. त्याचा निश्चित आनंद आहे.
टसर रेशीमसाठी ऐनवाडी गावाची निवड करण्यापूर्वी त्या परिसराचा अभ्यास करण्यात आला. टसर अळीचे खाद्य तेथील पोषक वातावरण ग्रामस्थांना पटवून देवून त्यांची भूमिका विचारात घेवून प्रत्यक्ष कामकाजास प्रारंभ केला. टप्प्याटप्प्याने टसर रेशीम उत्पादन त्यासाठी लागणारी बाजारपेठ यांचे नियोजन करण्यात येईल. हा उद्योग वृध्द, महिला, तरुण तसेच दिव्यांग व्यक्तीही करु शकतील.
-डॉ. योगेश फोंडे, उपजिविका तज्ज्ञ टसर(वन्य) रेशीम प्रकल्प
सहायक संचालक विभागीय माहिती कार्यालय, कोल्हापूर.
|