म. वि. प्र. मनमाड महाविद्यालयात राष्ट्रीय परिषद समारोप उत्साहात
नाशिक – आर्टिफिशियल इंटेलिजेंस (एआय) हे आत्मनिर्भर भारतासाठी ऑक्सिजनसारखे आहे. प्राध्यापकांनी स्वतः एआय शिकले तरच ते विद्यार्थ्यांना प्रभावीपणे शिकवू शकतील. एआय शिकणारे हेच येत्या काळात टिकतील. राजकारण, शिक्षण, अर्थकारण, समाजकारण, मानसशास्त्र असे सर्वत्र एआय वापरले जात आहे. जग बदलत असताना आपल्याला देखील एआय, डीएस म्हणजे डेटा सायन्स, एमएल म्हणजे मशीन लर्निंग आदी नवनवीन इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञान शिकावेच लागेल. चॅटजीपीटीवरून कट-कॉपी पेस्ट म्हणजे एआय नाही असे प्रतिपादन मविप्रचे शिक्षणाधिकारी डॉ. नितीन जाधव यांनी केले. दोन दिवसीय “आर्टिफिशियल इंटेलिजेंस व मशीन लर्निंग” राष्ट्रीय परिषदेच्या समारोप प्रसंगी अध्यक्षीय भाषणात राष्ट्रीय स्तरावरून आलेल्या सहभागी प्राध्यापक, संशोधक व विद्यार्थ्यांना संबोधताना ते बोलत होते. व्यासपीठावर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. डी.गव्हाणे, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापक इंजि. अनुज धर्मराव पाटील, एवायकेकेचे अभय महिला महाविद्यालय, धुळे येथील प्राचार्य डॉ. एस. जी. बाविस्कर, वडनेर भैरव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश वाघ, सटाणा महाविद्यालयाचे एमसीव्हीसी विभागप्रमुख प्रा. निरंजन जाधव आणि एआय तज्ज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. या राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, सिनेट सदस्य सागर वैद्य यांनी केले.
यावेळी मनमाड महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये संशोधन निबंध सादर करणाऱ्या खेडगाव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एन. कारे, पारुल विद्यापीठ वडोदरा च्या समाज कार्य विभागाचे डॉ. दीपक मखवाना, सिन्नर महाविद्यालयाचे भूगोल विभागप्रमुख प्रा. अमोल भगत, सिद्धिविनायक शिक्षणशास्त्र महाविद्यालयाचे प्राचार्य विक्रम घुगे, सोयगाव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एच. एम. क्षीरसागर, डॉ. विकास शिंदे तसेच विविध विद्यापीठे, महाविद्यालये व इतर राज्यांतील प्राध्यापक, संशोधक तसेच विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. प्रतिनिधिक स्वरूपात प्रा. अक्षय बळे, प्रा. वैशाली दामले, प्रा. प्रांजली ढेरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
एआय जगण्यासाठी अपरिहार्य
केटीएचएम महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य डॉ. सतीश श्रीवास्तव यांनी “एआयचा शिक्षण क्षेत्रावरील परिणामांचे विश्लेषण”, एआय तज्ज्ञ प्रा. किरणकुमार जोहरे यांनी “एआय व एमएल वापराने विविध क्षेत्रातील रोजगार व अर्थार्जन”, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे व्यवस्थापक इंजि. अनुज धर्मराव पाटील यांनी
“उद्योग क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता व मशीन लर्निंगचा वापर”, वडनेर भैरव महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेश वाघ यांनी “एआयचा आत्मनिर्भर व नैतिक भारत घडविण्यासाठी वापर” या विषयावर प्रमुख व्याख्याने दिलीत.
पारुल युनिव्हर्सिटी वडोदरा गुजरातचे अधिष्ठाता आणि संचालक प्रोफेसर डॉ. अजय त्रिवेदी यांनी बीजभाषण केले. आय.एम.आर.टी. व्यवस्थापन महाविद्यालयाचे संचालक डॉ. प्रशांत सूर्यवंशी यांनी “ए.आय.इन एग्रीकल्चर” व्याख्यान, प्रोफेशनल सी.ए. डॉ. प्रशांत कदम सर यांनी “एआय टूल्स हँड्स ऑन ट्रेनिंग” घेतले. “आर्टिफिशियल इंटेलिजेंस व मशीन लर्निंग” या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेत एआयची अपरिहार्यता अधोरेखित झाली. यावेळी शोध निबंध पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
‘एआय’मय राष्ट्रीय परिषदेत टिमवर्क
मराठा विद्या प्रसारक समाजाचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, मनमाड ता.नांदगाव जि.नाशिक येथे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे व गुणवत्ता सुधार कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने “आर्टिफिशियल इंटेलिजेंस व मशीन लर्निंग” परिषद आयोजन झाले. मविप्र नांदगाव तालुका संचालक इंजि. अमित भाऊ बोरसे पाटील यांनी मार्गदर्शनपर शुभेच्छा दिल्यात. उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षपदी महाविद्यालयीन विकास समितीचे अध्यक्ष बाळासाहेब साळुंखे होते. म.वि.प्र. समाज सेवक सदस्य जगन्नाथ निंबाळकर, मनमाड स्थानिक व्यवस्थापन समितीचे नरेंद्र कांबळे बाबूजी व श्री. सिद्धार्थ संसारे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. प्रास्ताविक मनमाड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. डी. गव्हाणे यांनी केले. सूत्रसंचालन व आभार मराठी विभाग प्रमुख प्रा. विजय पांगुळ यांनी मानले.
डॉ. प्रशांत कदम, प्रा. ए. बी. जाधव, प्रा. के . सी. गुंडगळ, प्रा. सचिन देवडे, प्रा.निलेश जाधव, प्रा.गणेश बर्वे, प्रा. पी. जी. गवळी, प्रा. संदीप लोखंडे, प्रा. नितीन गवळी, प्रा. वैभव धनगे, प्रा. ए. पी. नवले, प्रा. सायली गाढे, प्रा. सोनाली गाजरे, प्रा. कावेरी काकलीज, प्रा. प्रमिला भुरूक, कार्यालयीन सेवक, कर्मचारी व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी परिषद यशस्वी होण्यासाठी टिमवर्कने परिश्रम घेतले.

















































