गारगोटीत विशेष नेत्र रुग्णालयाचे लोकार्पण; अद्ययावत कॅथलॅबच्या कामाचा शुभारंभ

रविवारी सकाळी १० वाजता उपजिल्हा रुग्णालयात समारंभ; कॅथलॅबसाठी १९ कोटींचा निधी मंजूर

गारगोटी (प्रतिनिधी) – भुदरगड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्यसेवेत मोलाची भर घालणारे दोन महत्त्वाचे उपक्रम आज, रविवार दि.२२ नोव्हेंबर २०२६ रोजी साकार होत आहेत. गारगोटी येथील शासकीय नेत्र रुग्णालयाचा लोकार्पण समारंभ आणि अद्ययावत कॅथलॅबच्या कामाचा शुभारंभ सकाळी १०.०० वाजता उपजिल्हा रुग्णालय, गारगोटी येथे होणार आहे. सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.

३० बेडचे अत्याधुनिक नेत्र रुग्णालय

नागरिकांच्या सेवेसाठी नव्याने सुरू होणारे हे रुग्णालय ३० बेडचे असून अत्याधुनिक उपकरणांनी सुसज्ज आहे. येथे खालील विशेष सेवा उपलब्ध होणार आहेत :

• मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया

• डोळ्याला स्पर्श न करता अत्याधुनिक IOL मास्टरद्वारे लेन्सचा (IOL) नंबर मोजणे

• ऑपरेशननंतर येणारी जाळी काढण्यासाठी यॅग लेझर (YAG Laser) उपचार

• चष्म्याचा अचूक नंबर तपासणी

• लहान मुलांच्या डोळ्यांच्या आजारांची तपासणी व उपचार

• काचबिंदू तपासणी व उपचार

• काचबिंदूसाठी आवश्यक पेरिमेट्री चाचणी

• ओसीटी (OCT) स्कॅन (रेटिना / डोळ्याच्या मागील पडद्याचे स्कॅन)

• टेरिजियम शस्त्रक्रिया (डोळ्यावरील मांस / पडदा काढणे)

• लासूर (नासूर) तपासणी व शस्त्रक्रिया

• डोळ्यांचा दाब तपासणी

• कॅथलॅबसाठी १९ कोटींचा निधी मंजूर

हृदयविकारावरील उपचारांसाठी अद्ययावत कॅथलॅब उभारण्यासाठी १९ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून, त्याच्या कामाचा शुभारंभही याच कार्यक्रमात होणार आहे. या कॅथलॅबमध्ये पुढील सुविधा उपलब्ध होणार आहेत :

• १० आयसीयू बेड

• सर्व इक्विपमेंटसह मॉड्युलर ऑपरेशन थिएटर

• अँजिओग्राफी (रक्तवाहिन्यांची तपासणी / एक्स-रे चित्रण)

• अँजिओप्लास्टी (अरुंद झालेली रक्तवाहिनी रुंद करण्याची प्रक्रिया)

• ASD दुरुस्ती (हृदयाच्या वरच्या दोन कप्प्यांमधील भिंतीतील छिद्र बंद करण्याची शस्त्रक्रिया)

• VSD दुरुस्ती (हृदयाच्या खालच्या दोन कप्प्यांमधील भिंतीतील छिद्र बंद करण्याची शस्त्रक्रिया)

या सुविधांमुळे भुदरगडसह परिसरातील रुग्णांना नेत्रविकार आणि हृदयविकारावरील आधुनिक उपचार आता जवळच उपलब्ध होणार असून, उपचारासाठी शहरांकडे जावे लागण्याचा त्रास कमी होण्याची अपेक्षा आहे. सदर कार्यक्रमास तालुक्यातील सर्व नागरिकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.