१,५०० कोटींच्या मदतीने औद्योगिक पुनरुज्जीवनाला बळ – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
अमित शाह यांच्या हस्ते नॅशनल हेवी इंजिनिअरिंगच्या पुनर्निर्माण प्रकल्पाचे भूमिपूजन
‘भारत टॅक्सी’ सेवेचा पुण्यात शुभारंभ; सहकार क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन करून हजारो रोजगारांच्या संधी निर्माण करण्याचे उद्दीष्ट
पुणे– तब्बल ११ वर्षांपासून बंद असलेल्या नॅशनल हेवी इंजिनिअरिंग को-ऑपरेटिव्ह लिमिटेडच्या पुनर्निर्माण प्रकल्पाचे भूमिपूजन केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत पार पडले. या प्रकल्पासाठी केंद्र सरकारकडून १,५०० कोटी रुपयांची मदत उपलब्ध करून देण्यात येत असून, हजारो रोजगारांच्या संधी निर्माण होण्यासह ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे. तसेच चालकांनाच मालक बनविणाऱ्या ‘भारत टॅक्सी’ या सहकारी उपक्रमाचे पुण्यातील सेवेचे उद्घाटनही करण्यात आले. सहकार क्षेत्रात अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली आमूलाग्र परिवर्तन होत असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
यावेळी केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह, केंद्रीय सहकार राज्यमंत्री कृष्णपाल गुर्जर, केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री चंद्रकांतदादा पाटील, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, माधुरी मिसाळ, आशिष कुमार, पंकजकुमार बन्सल यांच्यासह खासदार, आमदार व मान्यवर उपस्थित होते.
शिंदे म्हणाले की, स्वतंत्र सहकार मंत्रालयाची स्थापना करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शाह यांच्याकडे जबाबदारी दिल्यानंतर सहकार क्षेत्राला नवी दिशा मिळाली. सहकारातील मक्तेदारी आणि अनिष्ट प्रवृत्तींना आळा घालत शेवटच्या शेतकऱ्यापर्यंत योजनांचे लाभ पोहोचविण्याचे काम सुरू आहे. साखर उद्योगाच्या अडचणी सोडवताना १० हजार कोटी रुपयांचा प्राप्तिकराचा प्रश्न मार्गी लावून कारखान्यांना दिलासा देण्यात आला. यावेळी दिवंगत अजितदादांचीही त्यांनी आठवण काढली.
हा प्रकल्प केवळ कारखान्याचे पुनरुज्जीवन नसून आत्मनिर्भर भारत आणि विकसित भारत २०४७ च्या संकल्पनेला बळ देणारा आहे. साखर, डेअरी, इथेनॉल, बायोगॅस आणि जैवआधारित उद्योगांसाठी लागणारी यंत्रसामग्री येथे तयार होणार असून, राष्ट्रीय डेअरी विकास मंडळाचीही साथ लाभणार आहे. सुमारे ११० एकर क्षेत्रातील या प्रकल्पामुळे स्वदेशी उत्पादन, कुशल मनुष्यबळ आणि ग्रामीण उद्योगांना चालना मिळेल. पूर्वीच्या भ्रष्टाचारामुळे बंद पडलेल्या सहकारी संस्था पुन्हा सुरू करणे ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
अमित शाह यांनी कोल्हापूरमध्ये दिलेला शब्द पाळत १,५०० कोटींची मदत उपलब्ध करून दिली. महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीबाबत पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांनी संवेदनशीलता दाखवत उपाययोजनांची विचारपूस केली. गडचिरोलीतील नक्षलवाद निर्मूलनाच्या कामाचेही त्यांनी कौतुक केले.
‘भारत टॅक्सी’च्या माध्यमातून चालकच मालक बनणार असून, मध्यस्थ आणि कमिशनशिवाय कष्टाचा मोबदला थेट मिळणार आहे. सारथी दीदी सारख्या उपक्रमांतून महिलांनाही टॅक्सी व्यवसायात संधी मिळून लाडक्या बहिणी आत्मनिर्भर होतील, असे ते म्हणाले.
यूपीए सरकारच्या १२ वर्षांत महाराष्ट्राला सुमारे २ लाख कोटी, तर एनडीए सरकारच्या १२ वर्षांत १५ लाख कोटी रुपयांचा निधी मिळाल्याचे सांगत केंद्राकडे राज्याच्या विकासासाठी ठामपणे मागणी केली पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले.
महाराष्ट्र हे देशाचे आर्थिक ग्रोथ इंजिन असून उद्योग, स्टार्टअप आणि गुंतवणुकीत राज्य आघाडीवर आहे. काहींना मोदी फोबिया आणि अमित शाह यांच्या नावाचा फोबिया असल्याने विकासकामांवर टीका केली जाते; मात्र चांगल्या कामाचे स्वागत करण्याची वृत्ती असली पाहिजे, असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला. या प्रकल्पामुळे उद्योग, रोजगार, सहकार आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी उभारी मिळेल, असा विश्वास व्यक्त करत त्यांनी अमित शाह आणि त्यांच्या टीमचे अभिनंदन केले.



























