नागपूर : आदिशक्ती भवानी ही मांगल्य, चैतन्य आणि ऊर्जेचे प्रतीक आहे. घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत संपूर्ण भारतात मांगल्याचे वातावरण असते. मानवी कल्याणासाठी प्राचीन काळापासून शक्तीच्या उपासनेला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
देवी भागवत पुराणानुसार देशात १०८, तर कालिका आणि शिवचरित्र पुराणानुसार ५१ ते ५२ शक्तीपीठे मानली जातात. यामध्ये महाराष्ट्राचे अहोभाग्य असे की, येथे देवीची साडेतीन शक्तीपीठे आहेत. यामध्ये पूर्ण पीठांमध्ये कोल्हापूरची श्री महालक्ष्मी (अंबाबाई), माहूरची श्री रेणुकामाता आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे आराध्य दैवत असलेली तुळजापूरची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी माता यांचा समावेश होतो. तर नाशिकचे सप्तशृंगगड हे अर्धे शक्तीपीठ मानले जाते. नवरात्रात नऊ दिवस देवीची आराधना केल्यानंतर दशमीला असुरी शक्तीचा नाश आणि सत्याचा विजय दर्शवणारा ‘विजयादशमी’ (दसरा) उत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
या पावन पर्वावर आपण निसर्ग रक्षणासाठी देवीला साकडे घालणे गरजेचे आहे. सध्या वाढते प्रदूषण, जंगलतोड आणि हवामान बदलामुळे (अल निनो प्रभाव) सृष्टीचे संतुलन बिघडले असून अनेक पशुपक्षी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. तसेच राज्यासह देशावर कोरड्या दुष्काळाचे सावट आहे. या पार्श्वभूमीवर, केवळ कागदावर किंवा फोटो काढण्यापुरते वृक्षारोपण न करता, नवरात्रीच्या नऊ दिवसांत युद्धपातळीवर वृक्षलागवडीची मोहीम राबवणे काळाची गरज आहे.
सण-उत्सवाच्या माध्यमातून निसर्गाचे संवर्धन केले, तरच भूमंडळावर सुख-शांती नांदेल. निसर्गाच्या कणाकणात देवीचे रूप असून, या वृक्षलागवडीमुळे जल, वायू आणि जमिनीचे संतुलन राखण्यास मदत होईल.
आदिशक्तीने देशावरील दुष्काळाचे संकट दूर करावे आणि सर्वांना सुख-समृद्धी द्यावी, हीच देवीचरणी प्रार्थना!
– रमेश कृष्णराव लांजेवार (स्वतंत्र पत्रकार, नागपूर)
Started a new company? Let us help you build a strong HR foundation—contact us for professional HR development, policies, processes, and people management solutions.












































































