महाराष्ट्राच्या राजकारणातील एक आश्वासक चेहरा… ना. प्रकाश आबिटकर
(शब्दांकन – विनायक जितकर) – आरोग्यमंत्री म्हणून कार्यभार स्वीकारल्यानंतर मा. प्रकाश आबिटकर यांनी आरोग्य विभागात विविध पातळ्यांवर सकारात्मक बदल घडवून आणले. ग्रामीण आरोग्य सेवेत सुधारणा, शासकीय रुग्णालयांचा दर्जा, औषधसाठा नियंत्रण, डिजिटल यंत्रणा, आणि डॉक्टर-रुग्ण संवाद या महत्त्वाच्या मुद्द्यांवर भर दिला. त्यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य विभाग अधिक कार्यक्षम आणि जनतेपर्यंत पोहोचणारा झाला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणातील एक आश्वासक नाव, जनसामान्यांशी घट्ट नाळ असलेले नेतृत्व आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. प्रकाश आबिटकर यांचा वाढदिवस म्हणजे त्यांच्या कार्यकर्तृत्वाला आणि समाजसेवेला सलाम करण्याचा दिवस. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त, त्यांच्या कार्यकर्तुत्वाच्या प्रवासाचा वेध घेणारा हा एक वाचनीय लेख.
जनतेच्या मनातील ‘प्रकाश’
राजकारणात अनेक चेहरे येतात आणि जातात, पण काही चेहरे असे असतात जे जनतेच्या मनात कायमचे घर करून राहतात. मा. ना. प्रकाश आबिटकर हे अशाच मोजक्या नेत्यांपैकी एक आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी-भुदरगड-आजरा तालुक्यातून आलेले आबिटकर हे केवळ एक आमदार किंवा पालकमंत्री नाहीत, तर ते सर्वसामान्य जनतेच्या आशा-आकांक्षांचे प्रतीक आहेत. त्यांचा प्रवास हा एका सर्वसामान्य कुटुंबातील मुलाने ध्येयवाद आणि कष्टाने राजकारणात आपले स्थान कसे निर्माण केले, याचे उत्तम उदाहरण आहे. आबिटकर यांच्या राजकीय प्रवासाची सुरुवात फारशी सोपी नव्हती. सुरुवातीच्या काळात अनेक अडचणींचा सामना करत सामाजिक कार्य सुरू आहे. ग्रामीण भागातील समस्यांची त्यांना चांगली जाण होती. शेतकरी, कष्टकरी, मजूर आणि तरुणांच्या प्रश्नांवर त्यांनी आवाज उचलला. त्यांच्या याच तळमळीमुळे आणि जनसंपर्कामुळे ते जनतेचे लाडके बनले.
दूरदृष्टी आणि प्रभावी कामगिरी
गतसाली त्यांना कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री पद मिळाले. हे पद स्वीकारल्यानंतर त्यांच्यावरील जबाबदारी आणखी वाढली. पालकमंत्री म्हणून त्यांनी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. कोल्हापूरच्या औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. जिल्ह्यातील पर्यटन स्थळांचा विकास, शेतीमालाला योग्य भाव मिळवून देण्यासाठी उपाययोजना, पूर परिस्थितीचे व्यवस्थापन आणि आपत्कालीन मदत कार्यात त्यांचा सक्रिय सहभाग नेहमीच वाखाणण्याजोगा राहिला आहे. याचबरोबर पत्रकारांच्या आरोग्यासाठी देखील एक पाऊल पुढे सरसावले. प्रशासनामध्ये पारदर्शकता आणि लोकाभिमुख कारभाराला प्राधान्य दिले. सर्व घटकांना सोबत घेऊन विकासाचा रथ पुढे नेण्याचा मानस आहे. विशेषतः तरुणांना रोजगार आणि त्यांना उद्योजक बनण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी त्यांनी योजनांवर भर दिला आहे.
आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा ! त्यांचे कार्य असेच बहरत राहो आणि त्यांच्या हातून जिल्ह्याचा, राज्याचा अधिकाधिक विकास होवो, सदिच्छा..!










































































