पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार शाहू छत्रपती यांच्या हस्ते राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवनाचे लोकार्पण

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

शाहू विचारांच्या जतनासाठी स्मारक नव्या रूपात नागरिकांना समर्पित

कोल्हापूर – कोल्हापूरच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वैभवाचे प्रतीक असलेल्या दसरा चौक येथील राजर्षी शाहू छत्रपती स्मारक भवनाचे नूतनीकरणानंतर आज सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी नूतनीकरणाच्या कोनशिलेचे अनावरण करण्यात आले तसेच सभागृहाच्या प्रवेशद्वारावरील फीत कापून स्मारक भवनाचे अधिकृत लोकार्पण करण्यात आले. याप्रसंगी महापौर रूपाराणी निकम, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. जॅसमिन, आमदार अशोक माने, उपमहापौर अक्षय जरग, निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, विविध मान्यवर, अधिकारी आणि मोठ्या संख्येने नागरिक, विद्यार्थी उपस्थित होते.

राजर्षी शाहू छत्रपती यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा जपणाऱ्या या ऐतिहासिक वास्तूचे आधुनिकीकरण करून ती अधिक सुसज्ज करण्यात आली आहे. नूतनीकरणामुळे स्मारक भवनातील मुख्य सभागृह, विश्रामगृह तसेच विद्युत व्यवस्था आधुनिक स्वरूपात विकसित करण्यात आली असून, सांस्कृतिक, शैक्षणिक, सामाजिक आणि ऐतिहासिक कार्यक्रमांसाठी हे भवन अधिक सक्षम झाले आहे. या कामासाठी एकूण ७.४९ कोटी रुपये खर्च करण्यात आले असून, त्यामध्ये मुख्य सभागृहाच्या ४०० आसनक्षमतेच्या कामांसह इतर दर्जोन्नतीसाठी २.२१ कोटी रुपये, विश्रामगृहातील १२ खोल्यांच्या उन्नतीकरणासाठी १ कोटी रुपये आणि विद्युत व्यवस्थेच्या कामांसाठी ४.२८ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी राजर्षी शाहू महाराजांनी सामाजिक न्याय, शिक्षण, समता आणि सर्वसमावेशक विकासासाठी केलेल्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. शाहू महाराजांचे विचार आणि कार्य पुढील पिढ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी हे नूतनीकरण केलेले स्मारक महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

खासदार श्रीमंत शाहू छत्रपती यांनी कोल्हापूर या कलानगरीत अशा प्रकारच्या सुसज्ज सभागृहांची आवश्यकता असल्याचे नमूद करून पुढील काळात त्याचे योग्य व्यवस्थापन करण्याची सूचना केली. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी कोल्हापूरकरांना सांस्कृतिक, सामाजिक आणि शैक्षणिक उपक्रमांसाठी दर्जेदार व्यासपीठ उपलब्ध झाल्याचे सांगितले. या वास्तूची योग्य निगा राखून व्यावसायिक पद्धतीने तिचा प्रभावी वापर व्हावा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून दर्जेदार काम पूर्ण झाल्याचेही त्यांनी नमूद केले. महापौर रूपाराणी निकम यांनी सर्व विभागांच्या समन्वयातून हे उत्कृष्ट काम पूर्ण झाल्याचे सांगितले. प्रास्ताविकात जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी नूतनीकरणाच्या कामाचा आढावा देत निधी उपलब्ध करून दिल्याबद्दल पालकमंत्री प्रकाश आबिटकर तसेच कामांना गती दिल्याबद्दल तत्कालीन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे आभार मानले.

कार्यक्रमात कामाची गती आणि दर्जा उत्कृष्ट राखल्याबद्दल कार्यकारी अभियंता क्रांतीकुमार मिरजकर, कार्यकारी अभियंता श्रीमती कट्टी, वास्तुविशारद विजय कोरणे, ठेकेदार अनिकेत जाधव कसबेकर, विनायक पाटील आणि श्री. निपाणे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार जिल्हा नियोजन अधिकारी विक्रम देशमुख यांनी मानले, तर सूत्रसंचालन श्री. टकले यांनी केले.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.