खोट्या जात प्रमाणपत्रांवर निवडणुका लढवणाऱ्यांवर कारवाईची मागणी
कोल्हापूर प्रतिनिधी (रुपेश आठवले) – आरक्षण व्यवस्थेचे संरक्षण व्हावे आणि खोट्या जात प्रमाणपत्रांच्या आधारे निवडणुका लढवून आरक्षणाचा गैरवापर करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी कोल्हापूर येथे सोमवारी आरक्षण बचाव संघर्ष मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा बिंदू चौक येथून सुरू होऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चामध्ये विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच -माजी आमदार, नगरसेवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आरक्षण व्यवस्थेचे रक्षण करणे ही संविधानिक जबाबदारी असल्याचे सांगत आंदोलकांनी घोषणाबाजी करत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मोर्चा वळवला. यावेळी अनुचित जाती आरक्षण बचाव समितीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात काही व्यक्तींनी खोट्या जात प्रमाणपत्रांच्या आधारे निवडणुका लढवून सार्वजनिक आरक्षण व्यवस्थेचा गैरवापर केल्याचा आरोप करण्यात आला. अशा प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर तसेच संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. आरक्षण ही सामाजिक न्यायाची महत्त्वाची व्यवस्था असून तिचा गैरवापर सहन केला जाणार नाही, असा इशाराही आंदोलकांनी यावेळी दिला.
यावेळी आरपीआय जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे माजी आमदार डॉ. सुजित मिणेचेकर राजू आवळे नगरसेवक दुर्वादास कदम शिवाजीराव कवाळे डी सी भास्कर सुभाष देसाई प्रेमानंद मौर्य डॉ. शरद गायकवाड जिल्हा परिषद सदस्य राहुल आवळे, दीपक खांडेकर श्रीकांत मोरे, अविनाश बनगे सतीश माळगे, दीपक भोसले, व अन्य पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. मोर्चामुळे शहरातील काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता. पोलिस प्रशासनाने योग्य बंदोबस्त ठेवून परिस्थिती नियंत्रणात ठेवली.

















































