राजश्री जाधव-पाटील यांच्यासह पुण्यातील स्वप्ना आहेरवाडीकर आणि डॉ. मंगल कुलकर्णी यांनी अत्यंत चिकाटी, शिस्त आणि सातत्य दाखवत विक्रम साध्य
पुणे (प्रतिनिधी) – शारीरिक तंदुरुस्ती आणि मानसिक एकाग्रतेचा संदेश देणाऱ्या ‘सूर्योथॉन’ या २४ तास अखंड सूर्यनमस्कार साधना उपक्रमात यंदा महिलांनी उल्लेखनीय कामगिरी करत अनोखा विक्रम नोंदविला. ८ आणि ९ फेब्रुवारी २०२६ रोजी पुणे येथे एसपी’स योगा स्टुडिओच्या वतीने आयोजित या उपक्रमात राजश्री जाधव-पाटील, स्वप्ना आहेरवाडीकर आणि डॉ. मंगल कुलकर्णी यांनी सलग २४ तासांत प्रत्येकी २४२४ सूर्यनमस्कार पूर्ण करून विशेष कामगिरी केली.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या मुख्य लेखा व वित्त अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या राजश्री जाधव-पाटील यांच्यासह पुण्यातील स्वप्ना आहेरवाडीकर आणि डॉ. मंगल कुलकर्णी यांनी अत्यंत चिकाटी, शिस्त आणि सातत्य दाखवत हा विक्रम साध्य केला. या उपक्रमाचे संकल्पक व आयोजक सचिन पारुंडेकर यांनी सांगितले की, सूर्योथॉनचे हे सलग १४ वे वर्ष असून दरवर्षी अधिकाधिक साधक उत्साहाने सहभागी होत आहेत. शनिवारी सूर्यास्तापासून सुरू झालेली साधना रविवारी सूर्यास्तापर्यंत अखंड सुरू राहिली. या वर्षीच्या स्पर्धेत १३५ हून अधिक साधकांनी सहभाग घेत एकत्रितपणे ७५ हजारांहून अधिक सूर्यनमस्कार पूर्ण केले. शारीरिक क्षमता, मानसिक स्थैर्य आणि आरोग्याबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी हा उपक्रम प्रभावी ठरत असल्याची प्रतिक्रिया आयोजकांनी व्यक्त केली.
या विक्रमामुळे महिलांच्या फिटनेस आणि सातत्यपूर्ण साधनेच्या क्षमतेचा प्रेरणादायी संदेश समाजापर्यंत पोहोचला असून सहभागी साधकांचे विविध स्तरांतून कौतुक होत आहे. सूर्योथॉन उपक्रम मध्ये सहभागी होण्याचे हे दुसरे वर्ष होते. मागील वर्षी २४०० सूर्यनमस्कार पूर्ण करणारी मी एकमेव महिला होते. यावर्षी आम्ही तिघींनी २४२४ सूर्यनमस्कार चे शिवधनुष्य पेलले. सूर्यनमस्कार मधील सातत्य आणि त्यातून वाढलेल्या सहनशीलतेतून असा विक्रम करणे शक्य झाले. यावर्षी मी जगातील सर्वोच्च शिखर माउंट एव्हरेस्ट शिखर सर करण्यासाठी जाणार आहे. सूर्योथॉन स्पर्धेमुळे स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक क्षमतेची चाचपणी या निमित्ताने करता आली. महिलांनी निरोगी राहण्यासाठी सूर्यनमस्कार सारखा सर्वांगीण व्यायाम नित्यनेमे करावा.

















































