“मतदारांना गृहीत धरणाऱ्यांना जनता निवडणुकीत धडा शिकवेल…
पाचगणी (प्रतिनिधी) – आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार वंदना भिलारे यांच्या प्रचाराला वेग आला असून त्यांनी मतदारांशी थेट संवाद साधत आहेत. “मतदारांना गृहीत धरणाऱ्यांना जनता निवडणुकीत निश्चितच धडा शिकवेल,” असा ठाम इशारा त्यांनी यावेळी दिला. गावो गावी घरोघरी जाऊन मतदारांची भेट घेतली. वंदना भिलारे यांनी नागरिकांशी संवाद साधताना स्थानिक विकास, पायाभूत सुविधा, महिला व युवकांच्या प्रश्नांवर सविस्तर भूमिका मांडली. माजी सरपंच म्हणून मिळालेल्या अनुभवाच्या जोरावर गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले. लोकप्रतिनिधी हा केवळ निवडणुकीपुरता नसून तो कायम जनतेच्या संपर्कात असला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले.
वंदना भिलारे यांनी यापूर्वी सरपंच पद भूषवून प्रशासनात आपली ठसठशीत छाप उमटवली आहे. सामाजिक प्रश्नांची जाण आणि लोकांच्या अडचणी समजून घेण्याची क्षमता ही त्यांची जमेची बाजू असून प्रशासकीय कामाचा अनुभव त्यांच्या कार्यातून दिसून येतो. सत्ता, पद आणि अधिकारांपेक्षा सामान्य जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे. त्यांचे पती प्रवीण भिलारे हे राजकारणात सक्रिय असून तळागाळातील जनतेशी त्यांचा थेट संपर्क आहे. गावागावातील लोकांशी असलेला त्यांचा दांडगा जनसंपर्क, संघर्षातून उभे राहिलेले नेतृत्व आणि जनहितासाठी केलेले काम यामुळे नागरिकांमध्ये त्यांच्यावर मोठा विश्वास आहे. या मजबूत सामाजिक व राजकीय पाठबळाच्या जोरावर वंदना भिलारे यांचा प्रचार अधिक प्रभावी ठरत आहे.
या प्रचारात राजेंद्र शेठ राजपुरे यांच्याकडे असलेल्या दांडग्या जनसंपर्कामुळे आणि जिल्हा बँकेच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांसाठी केलेल्या कामामुळे भिलार गणात त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. वंदनाताईंच्या प्रचारात राजेंद्र शेठ स्वतः मैदानात उतरल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह संचारला आहे. केवळ राजकीय गणितं न मांडता, सर्वसामान्य माणसाच्या सुख-दुःखात सहभागी होणारे नेतृत्व म्हणून राजपुरे यांची ओळख आहे. त्यांच्या नियोजनामुळे आणि माजी सभापती रुपालीताई राजपुरे यांच्या महिला संघटनावरील पकडीमुळे वंदनाताईं आघाडीवर आहेत.मतदारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मतदान करण्याचे आवाहन केले. “सामान्य माणसाच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून काम करणारा पक्ष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आहे. विकास, पारदर्शक कारभार आणि जनहितासाठी राष्ट्रवादीला भरघोस पाठिंबा द्यावा,” असे त्यांनी सांगितले.
सभा दरम्यान नागरिकांनी पाणीपुरवठा, रस्ते, वीज, आरोग्य सुविधा आणि रोजगार यासारख्या प्रश्नांबाबत अपेक्षा व्यक्त केल्या. या सर्व प्रश्नांची सोडवणूक प्राधान्याने केली जाईल, अशी ग्वाही वंदना भिलारे यांनी दिली. मतदारांचा विश्वास आणि पाठिंबा हाच आपला खरा भांडवल असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रचारात नागरिकांचा वाढता प्रतिसाद पाहता वंदना भिलारे प्रचारात आघाडीवर असल्याचे स्पष्ट होत आहे. येत्या निवडणुकीत जनता योग्य निर्णय घेऊन मतदारांना गृहीत धरणाऱ्या प्रवृत्तींना चोख प्रत्युत्तर देईल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.भिलार गणात केवळ विजय नव्हे, तर विक्रमी मताधिक्य मिळवण्यासाठी सर्व समर्थक कामाला लागले आहेत. राजेंद्र शेठ राजपुरे आणि भिलारे कुटुंबीयांच्या एकत्रित ताकदीमुळे भिलार गणात आता विजयाचा गुलाल उधळला जाणार असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

















































