उपस्थिताना मार्गदर्शन करताना ना.शिवेंद्रसिह राजे भोसले, डी एम बावळेकर, नितीन भिलारे, लक्ष्मी कऱ्हाडकर,तानाजी भिलारे, चिन्मय कुलकर्णी आणी वैशाली भिलारे
पाचगणी – भिलार गावाला ‘पुस्तकांचे गाव’ म्हणून राज्यभर आणि देशपातळीवर ओळख मिळवून देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य भारतीय जनता पक्षानेच केले आहे. ही ओळख टिकवून ठेवत गावाचा आणि संपूर्ण तालुक्याचा सर्वांगीण विकास साधायचा असेल, तर भाजपच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याशिवाय पर्याय नाही, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री ना. श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
भिलार गणातील भाजपच्या उमेदवार सौ. सुप्रिया अनिल भिलारे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर भाजप व महायुतीचे पदाधिकारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी तसेच कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. सभेला ग्रामस्थांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. ना. शिवेंद्रसिंहराजे पुढे म्हणाले की, “आमचे राजकारण केवळ सत्तेसाठी नसून विकासासाठी आहे. भिलारसारख्या गावाला ‘पुस्तकांचे गाव’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवून पर्यटन, संस्कृती आणि शिक्षणाला चालना देण्याचे काम भाजप सरकारने केले. त्यामुळेच भिलार आज एक वेगळी ओळख निर्माण करू शकले आहे.” त्यांनी विरोधकांवर टीका करत सांगितले की, मोठ्या नेत्याच्या घरातील उमेदवारालाही तिकीट नाकारणे म्हणजे त्यांच्या राजकारणाची अधोगती आहे. तालुक्याच्या विकासाबाबत बोलताना त्यांनी गावठाण विस्तार, मूलभूत सुविधा, रस्ते, पर्यटन विकास आणि शेतीपूरक उद्योगांवर भर देण्यात येत असल्याचे सांगितले. पाचगणी–महाबळेश्वर रस्त्याचे काम लवकरच पूर्ण करण्यासाठी आपण स्वतः लक्ष घालत असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच भविष्यात पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेता वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पर्यायी घाट रस्त्याचा विचार सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी डी. एम. बावळेकर यांनी स्थानिक सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर जोरदार तोफ डागली. ते म्हणाले, “स्वतःच निधी आणायचा आणि स्वतःच्याच बगलबच्यांना कामे वाटायची असा प्रकार सुरू आहे. निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे रस्ते उखडत आहेत. या ‘मलिदा गँग’ला हद्दपार करण्याची हीच योग्य वेळ असल्याचे सांगितले.
या प्रचार सभेला चिन्मय कुलकर्णी, माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर, नगरसेवक रवींद्र कुंभारदरे, नितीनदादा भिलारे, लक्ष्मी कऱ्हाडकर, तानाजी भिलारे, किसनशेठ भिलारे, विजयराव भिलारे, श्रीहरी गोळे, आशिष नायडू, भाईजी गावडे, नगरसेवक वैभव कऱ्हाडकर, नंदकुमार बावळेकर, अमोल चोरमले, नितीनभाई भिलारे, बाबाजी उंबरकर, वैशाली भिलारे, तानाजी भिलारे, उमेश गुरव, योगेश भिलारे, अनिल भिलारे, चेतन पारठे, उमेदवार रंजना कदम, सुप्रिया अनिल भिलारे तसेच मोहन गोळे, विनायक भिलारे, संतोष गोळे, चेतन पार्टे यांच्यासह अनेक कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सभेत किसनशेठ भिलारे यांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक किसनशेठ भिलारे यांनी केले, सूत्रसंचालन प्रमोद पवार यांनी केले तर आभार अनिल भिलारे यांनी मानले. सभेच्या माध्यमातून भिलारकरांनी विकासाच्या प्रवाहासोबत राहावे आणि भाजपच्या उमेदवारांना विजयी करावे, असे आवाहन करण्यात आले.

















































