आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा या भावनेतून अशा उपक्रमांची अंमलबजावणी
गारगोटी (विनायक जितकर) – ज्येष्ठ नागरिकांच्या दैनंदिन जीवनात आत्मनिर्भरता आणि सन्मान निर्माण व्हावा, या उद्देशाने गारगोटी येथे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोफत सहाय्यक उपकरणे वाटप कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमात आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते गरजू ज्येष्ठ नागरिकांना चालण्याच्या काठ्या, श्रवणयंत्रे, कोपर काठी, घडीचे वॉकर, गुडघ्याचा पट्टा, कमोड व्हील चेअर, कमोड खुर्ची, मानेचा पट्टा, पाठीचा पट्टा तसेच इतर आवश्यक सहाय्यक उपकरणांचे मोफत वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे अनेक ज्येष्ठांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद स्पष्टपणे दिसून आला.
यावेळी बोलताना पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, “ज्येष्ठ नागरिक हे समाजाचे आधारस्तंभ आहेत. त्यांच्या आरोग्य, सुरक्षितता आणि स्वावलंबनासाठी शासन कटिबद्ध आहे. त्यांच्या गरजांनुसार अशा उपक्रमांच्या माध्यमातून त्यांना आधार देणे हीच खरी सामाजिक जबाबदारी आहे.” “आरोग्य सेवा हीच ईश्वर सेवा या भावनेतून अशा उपक्रमांची अंमलबजावणी करण्यात येत आहे. केवळ योजना कागदावर न राहता त्या प्रत्यक्ष गरजूंपर्यंत पोहोचल्या पाहिजेत, हाच माझा प्रयत्न आहे. या सहाय्यक उपकरणांमुळे लाभार्थ्यांचे जीवन अधिक गतिमान, सुरक्षित व आत्मनिर्भर होईल, याचा मला मनापासून आनंद आहे.” या उपक्रमाबद्दल उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे आभार मानत, अशा लोकाभिमुख योजनांमुळे आपले जीवन अधिक सुलभ होत असल्याची भावना व्यक्त केली.
गारगोटी येथे पार पडलेला हा कार्यक्रम सामाजिक संवेदनशीलतेचा आदर्श ठरला आहे. या कार्यक्रमास कल्याणराव निकम, यशवंत उर्फ बाबा नांदेकर, विक्रम भैया पाटील, प्राचार्य मिलिंद पांगिरेकर, अवधूत परुळेकर, शरद मोरे, युवराज सुर्वे यांच्यासह अनेक मान्यवर, पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.



















































