“भारतीय राज्यघटना: मूलभूत संरचना सिद्धांताचा विकास” या विषयावरील एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्र
कोल्हापूर – व्यक्ती, समाज आणि देशाच्या सर्वांगीण समृद्धीचा मार्ग भारतीय संविधानातूनच जातो, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आज केले. शिवाजी विद्यापीठाचे दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्र, गांधी अभ्यास केंद्र आणि समाज कल्याण विभाग, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने पीएम-उषा योजनेअंतर्गत आयोजित “भारतीय राज्यघटना: मूलभूत संरचना सिद्धांताचा विकास” या विषयावरील एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. प्रभारी प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव अध्यक्षस्थानी होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून कोल्हापूरचे माजी जिल्हाधिकारी तथा ज्येष्ठ साहित्यिक लक्ष्मीकांत देशमुख, समाजकल्याण सहाय्यक आयुक्त सचिन साळे उपस्थित होते.
जिल्हाधिकारी येडगे म्हणाले, भारतासारख्या विविधतेने नटलेल्या देशात जात, धर्म, वंश, पंथ यांतील भिन्नता असूनही एकात्मता जपण्याचे कार्य भारतीय संविधान करते. असे सक्षम, सर्वसमावेशक आणि मूल्यआधारित संविधान जगात दुर्मिळ आहे. सरनाम्यातील प्रत्येक शब्द हा सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनाशी जोडलेला आहे. म्हणून संविधानाचा अभ्यास आणि पालन सर्वांनी केले पाहिजे. संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय ही मूल्ये प्रत्येक व्यक्तीला सन्मानपूर्वक जीवन जगण्यासाठी आधार देतात. लोकशाही बळकट होण्यासाठी जागृत नागरिक होणे गरजेचे आहे. ‘हर घर संविधान’ या उपक्रमाला सर्वांनी हातभार लावावा. शाळा स्तरावर संविधानातील कलमे व सरनाम्याचा अर्थ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
अध्यक्षीय भाषणात प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव म्हणाल्या, नागरिक म्हणून आपण हक्कांची मागणी करत असताना कर्तव्यांची जाणीवही अंगी बाणवली पाहिजे. भारतीय राज्यघटना हा एक जिवंत दस्तऐवज आहे. तिच्या मूलभूत तत्त्वांमध्येच राष्ट्रजीवनाला स्थैर्य, दिशा आणि मूल्याधिष्ठान मिळते. यानंतरच्या सत्रात लक्ष्मीकांत देशमुख यांनी संविधानाच्या मूलभूत संरचनेच्या अनुषंगाने सविस्तर मार्गदर्शन केले. भारतीय राज्यघटना ही भारतातील नागरिकांची कवच कुंडले आहेत. नागरिकांनी आदर्श बननेसाठी संविधान अंगिकारून संविधानातील मूलभूत हक्क, अधिकार व कर्तव्ये याचे पालन केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
धी अभ्यास केंद्राचे समन्वयक डॉ. प्रकाश पवार यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. नगिना माळी आणि प्रियांका सुर्वे यांनी सूत्रसंचालन केले. दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राचे संचालक डॉ. कृष्णा पाटील यांनी आभार मानले. कार्यक्रमास कुलसचिव डॉ. विलास शिंदे, डॉ. एस. एच. पाटील, डॉ. श्रीराम पवार, उपकुलसचिव डॉ. निलेश बनसोडे, विलास सोयम, डॉ उत्तम सकट, विनय शिंदे यांच्यासह विविध महाविद्यालयांतील विद्यार्थी, विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.












































