कोल्हापूर जिल्हा ऑटोरिक्षा संघर्ष समितीची पासिंग फी वाढीविरोधात तीव्र नाराजी

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

शासनाने अन्यायकारक फी वाढ तत्काळ मागे घ्यावी – आंदोलनाची चेतावणी

कोल्हापूर – केंद्र व राज्य शासनाने वाहनांच्या पासिंग फी (योग्यता प्रमाणपत्र नूतनीकरण) मध्ये केलेल्या भरमसाठ वाढीविरोधात कोल्हापूर जिल्हा ऑटोरिक्षा संघर्ष समितीने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “रिक्षा, टेम्पो, ट्रक आदी परिवहन संवर्गातील वाहनमालकांचे कंबरडे मोडणाऱ्या या वाढीविरोधात आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल,” अशी चेतावणी संघर्ष समितीने आपल्या निवेदनात दिली आहे.

समितीचे सचिव सुभाष शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली सादर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, वाहतूक व्यवसाय आधीच आर्थिक संकटातून जात असताना शासनाने कोणताही दिलासा न देता फी वाढ करणे हा निषेधार्ह निर्णय आहे.

समितीने विचारलेल्या प्रश्नानुसार —
मोठमोठ्या उद्योगपती व भांडवलदारांना कर्जमाफी, मोफत जमीन, वीजसवलती दिल्या जातात, मात्र अल्पउत्पन्न घटकातील वाहनमालकांवरील ओझे मात्र दिवसेंदिवस वाढवले जात आहे. “गरीब अधिक गरीब होत आहे, शासनाची धोरणे समजण्यास कठीण झाली आहेत,” असा सूर वाहनमालकांनी व्यक्त केला. १५ वर्षांवरील वाहनांसाठी आठपट वाढ व दररोज ५० रुपये विलंब दंडाबाबत तीव्र आक्षेप समितीने १५ वर्षे पूर्ण झालेल्या वाहनांच्या पासिंग शुल्कातील आठ पट वाढ तसेच विलंब झाल्यास दररोज ५० रुपये आकारणी हा निर्णय पूर्णपणे अन्यायकारक असल्याचे म्हटले आहे.

शेजारील राज्यांनी फी वाढ फेटाळली — महाराष्ट्रातच अन्याय?
कर्नाटक, गुजरात, तामिळनाडू, आंध्रप्रदेश या राज्यांनी केंद्रातील वाढ थेट स्वीकारण्यास नकार देत वाहनधारकांना दिलासा दिला आहे. परंतु महाराष्ट्र शासनाने केंद्राचा निर्णय तसाच स्वीकारणे बंधनकारक नसतानाही तसे केले, याबद्दल समितीने नाराजी व्यक्त केली.

मागण्या पुढीलप्रमाणे –

पासिंग फी वाढ रद्द करण्यात यावी

दररोजचा ५० रुपये विलंब दंड त्वरित मागे घ्यावा

१५ वर्षांवरील वाहनांच्या पासिंगवरील वाढीव शुल्कात कपात करावी या न्याय्य मागण्या महाराष्ट्र शासन व परिवहन आयुक्तांपर्यंत पोहोचवून दिलासा द्यावा, अशी विनंती प्रादेशिक परिवहन अधिकारी, कोल्हापूर यांना करण्यात आली आहे. मागण्यांचा विचार न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा समितीने दिला आहे. निवेदनावर अविनाश दिंडे, ईश्वर चन्नी, अरुण घोरपडे, शर्नुपनि शेख, जाफर मुजावर, बाळासो सादिलगे, विजय गायकवाड, शंकरलाल पंडीत, अतुल पवार, शशिकांत ढवण, रमेश पवार, मारूती पवार, राजेंद्र थोरावडे, नरेंद्र पाटील, संभाजी रणदिवे, राकेश गायकवाड, श्रीकांत भोळे, विनोद शिंदे, शिवाजी पाटील, संजय केसरकर, अतुल माळकर, निवास बोडके आदींच्या सह्या आहेत.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.