आदर्श आचारसंहिता लागू असताना निवडणूक प्रक्रिया भयमुक्त आणि विनाअडथळा पार पडावी
कोल्हापूर – नगरपरिषद व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूक 2025 च्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाने कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कडक बंदोबस्ताचे सलग आदेश जाहीर केले आहेत. राज्य निवडणूक आयोगाने 4 नोव्हेंबर 2025 रोजी कार्यक्रम घोषित केल्यानंतर जिल्ह्यातील 10 नगरपरिषद आणि 3 नगरपंचायतींसाठीची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली असून 2 डिसेंबर रोजी मतदान तर 3 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.
आदर्श आचारसंहिता लागू असताना निवडणूक प्रक्रिया भयमुक्त आणि विनाअडथळा पार पडावी यासाठी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 च्या कलम 163 अंतर्गत जिल्हादंडाधिकारी अमोल येडगे यांनी निर्बंध लादले आहेत. 1 डिसेंबर रोजी रात्री 10 नंतर सर्व प्रकारचा जाहीर प्रचार, सभा, मोर्चे, मिरवणुका आणि ध्वनिक्षेपकाचा वापर तसेच प्रसारमाध्यमांमधील जाहिरात व प्रचारबंदी लागू राहणार आहे. निवडणूक काळात लाऊडस्पीकर वापरण्यासाठी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांची लेखी परवानगी अनिवार्य राहील आणि त्याचा वापर केवळ सकाळी 6 ते रात्री 10 या कालावधीतच करता येणार आहे.
मतदानाच्या पार्श्वभूमीवर 1 डिसेंबर सायंकाळी 6 पासून ते 2 डिसेंबर रोजी मतदान संपेपर्यंत मतदान केंद्रांभोवती विशेष सुरक्षा कक्ष निर्माण करण्यात आला आहे. मतदान केंद्रापासून 200 मीटर परिसरात राजकीय पक्षांचे बुथ, प्रचार साहित्य आणि सर्व प्रकारची वाहने प्रतिबंधित असतील, तर 100 मीटर मर्यादेत मोबाईल फोन, कॉर्डलेस, वायरलेस सेट यांसारखी साधने बाळगणे व वापरणे मनाई आहे. मतदान केंद्रातील प्रतिनिधींनाही मतदारांच्या गोपनीयतेचा भंग होईल असे फोटो काढणे किंवा चित्रीकरण करण्यास मज्जाव करण्यात आला असून या भागात कोणतीही शस्त्रे बाळगण्यावर स्पष्ट बंदी घालण्यात आली आहे. यापूर्वी जाहीर आदेशानुसार 1 डिसेंबर रात्री 10 नंतर बेकायदेशीर जमाव, सार्वजनिक सभा, बैठका व पाचपेक्षा अधिक लोकांचे अनधिकृत जमणे प्रतिबंधित करण्यात आले आहे.
मतमोजणीसाठी 3 डिसेंबर रोजी पन्हाळा, मलकापूर, वडगाव, हुपरी, हातकणंगले, जयसिंगपूर, शिरोळ, कुरुंदवाड, गडहिंग्लज, आजरा, चंदगड, कागल आणि मुरगूड नगरपरिषद/नगरपंचायतींसाठी ठरवलेल्या केंद्रांच्या परिसरात विशेष निर्बंध लागू राहतील. सकाळी 7 वाजल्यापासून मतमोजणी पूर्ण होईपर्यंत 200 मीटर परिसरात केवळ अधिकृत मतमोजणी कर्मचारी, उमेदवार व त्यांचे नियुक्त प्रतिनिधी यांनाच प्रवेश असेल; इतरांसाठी प्रवेशबंदी, वाहनचालना, मोबाईल वापर, लाऊडस्पीकर, शस्त्र बाळगणे तसेच भडक भाषणे, चिन्हांचे प्रदर्शन किंवा आचारसंहिता भंग करणारी कृती पूर्णपणे बंद असेल.
विजय घोषणेनंतर होणारा संभाव्य गोंधळ व कायदा-सुव्यवस्था बिघडू नये म्हणून 3 डिसेंबर रोजी संपूर्ण जिल्ह्यात विजयी मिरवणुका, रॅली, सार्वजनिक ठिकाणी गुलाल उधळणे आणि फटाके फोडणे यावरही प्रतिबंध लावण्यात आला आहे. या सर्व आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहितेच्या कलम 223 तसेच लोकप्रतिनिधी अधिनियम 1951 अंतर्गत कारवाई होणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात स्पष्ट नमूद केले आहे.












































