रिक्षाचालकाची प्रामाणिकता — विसरलेली चार लाखांची रक्कम प्रवाशास परत
कोल्हापूर:(टीम वॉच ) :
मानवतेचा आणि प्रामाणिकतेचा जिवंत नमुना कोल्हापूर शहरात पाहायला मिळाला. रिक्षाचालक रामचंद्र जाधव (वय 59, रा. लक्षतीर्थ वसाहत, कोल्हापूर) यांनी आपल्या रिक्षेत सापडलेली ₹4 लाखांची पिशवी कोणतीही मोह किंवा लालसा न ठेवता थेट पोलिसांच्या ताब्यात दिली.
मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास, जाधव यांनी आपल्या प्रवासी रिक्षा (क्रमांक MH09 G 8025) मधून अथर्व नारायण पुजारी (रा. नरसोबाची वाडी) यांना महाद्वार रोड येथे सोडले. काही वेळाने रिक्षा साफ करताना प्रवाशाची रोखरक्कम असलेली पिशवी त्यांच्या निदर्शनास आली.
रिक्षाचालकाने प्रामाणिकतेचे उदाहरण घालत कोणताही विलंब न लावता पिशवी थेट जुना राजवाडा पोलीस ठाण्यात जमा केली. काही तासांनंतर अथर्व पुजारी हे हरवलेल्या रकमेबाबत तक्रार देण्यासाठी पोलीस ठाण्यात आले असता, तपासानंतर तीच रक्कम असल्याची खात्री करून पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या हस्ते प्रवाशास ती परत करण्यात आली.
या प्रामाणिक कृतीबद्दल पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांनी रिक्षाचालक रामचंद्र जाधव यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.
मानवी मूल्यांची जपणूक करणाऱ्या अशा प्रामाणिक नागरिकांचे Positive Watch पोर्टलतर्फे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले आहे.
“पैसा येतो-जाता राहतो, पण प्रामाणिकतेसारखी संपत्ती अमूल्य असते!”
— Positive Watch संपादकीय विभाग















































