धामोड येथे भानोबा महिला व्यापारी असोसिएशन चौथी वार्षिक सर्वसाधारण सभा
राधानगरी – महिलांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी आणि त्यांच्या हाताला रोजगार मिळवून देण्यासाठी आमच्या ताराराणी फेडरेशनचा मुख्य उद्देश आहे. फेडरेशनच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण आणि आत्मनिर्भरतेसाठी विविध उपक्रम राबवून महिलांना आर्थिक सुबत्ता उपलब्ध करून देणार तसेच “प्रत्येक महिला ही उद्याची यशस्वीता होणार आहे” असे प्रतिपादन ताराराणी फेडरेशनच्या अध्यक्षा सौ विजयालक्ष्मी आबीटकर यांनी धामोड ता. राधानगरी येथे केले. भानोबा महिला व्यापारी असोसिएशनच्या चौथ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्या प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होत्या. अध्यक्षस्थानी सुरेखा दामूगडे होत्या. यावेळी त्यांनी संस्थेच्या कार्यास शुभेच्छा दिल्या. स्वागत आणि सूत्रसंचालन प्रियांका पाटील यांनी केले. प्रास्ताविक सरिता तेली यांनी केले. अहवाल वाचन करिश्मा पाटील यांनी केले.
सौ आबिटकर पुढे म्हणाल्या जिल्हा उद्योग केंद्र पुरस्कृत आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत आयोजित निवासी उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम शिबिरांचे आयोजन करणे. महिलांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे, प्रशिक्षणानंतर महिलांना बँकेमार्फत कर्ज वाटप आणि वस्तू वितरण कार्यक्रमांचे आयोजन करणे हा आमचा उद्देश असून सर्व महिलांनी ताराराणी फेडरेशनचे सदस्य व्हावे असे आवाहन त्यांनी केले. यावेळी महिला व्यापारी असोसिएशनच्या नूतन अध्यक्षपदी सौ माया तेली तर उपाध्यक्षपदी ऐश्वर्या नलवडे यांची निवड करण्यात आली. त्यांचा फेटा पुष्पगुच्छ देऊन सत्कार सौ विजयालक्ष्मी आबीटकर यांच्या हस्ते करण्यात आला. प्रमुख पाहुणे व त्यांचे सहकारी यांचाही महिलांच्या वतीने फेटा व पुष्पगुच्छ देऊनसत्कार करण्यात आला. यावेळी अनेक महिला सदस्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
पुरुषांच्या बरोबरच भानोबा महिला व्यापारी संस्थेचे कार्य आदर्शवत आहे, त्यांच्या भावी वाटचालीस मी शुभेच्छा देते असे प्रतिपादन सरपंच रेश्मा नवणे यांनी केले. महिलांना प्रशिक्षण, आर्थिक मदत, सरकारी योजना आणि त्यांच्या व्यवसायांच्या विस्तारावर भर दिला जात आहे. महाराष्ट्र सरकारने विविध कामे महिला सहकारी संस्थांना देण्याची घोषणा केली आहे आणि ‘लाडकी बहीण’ योजनेअंतर्गत त्याचे जाळे वाढवण्यावर भर दिला जात आहे. महिलांसाठी व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन आणि आर्थिक सहाय्य देणाऱ्या अनेक संस्था कार्यरत आहेत. त्यापैकीच ताराराणी महिला फेडेरेशन आहे असे प्रतिपादन प्रियांका पाटील यांनी केले.
यावेळी भानोबा व्यापारी पुरुष असोसिएशनचे एम.डी फडके, अनिल चौगले, दीपक तेली, अशोक पाटील, विठ्ठल पाटील, सागर खोत, सुभाष नलवडे, अभय कोरे, विशाल कोरे, प्रकाश बुरुड, पत्रकार अरविंद पाटील, सर्व महिला सदस्य उपस्थित होते. आभार भाग्यश्री कोरे यांनी मानले.












































