पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या नोंदणी अभियानाचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते संपन्न
सांगली :
पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघातील 2026 मध्ये होणाऱ्या निवडणुकीसाठी नवीन मतदार नोंदणी अभियानाचा शुभारंभ भोसले गार्डनसमोर, चव्हाण मळा, पदमाळे फाटा, सांगली येथे करण्यात आला. हे अभियान आयोजक प्रवक्ते मा. संतोष पाटील यांच्या नियोजनाखाली पार पडले.
या प्रसंगी डीपीआयचे अध्यक्ष मा. प्रा. सुकुमार कांबळे सर आणि शिवसेना (ठाकरे गट) चे सांगली जिल्हाप्रमुख मा. शंभूराज काटकर साहेब यांच्या शुभहस्ते मतदार नोंदणी फॉर्म भरून उद्घाटन करण्यात आले.
या वेळी प्रा. सुकुमार कांबळे सर म्हणाले,
“पुणे पदवीधर व शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत पूर्वी काही विशिष्ट लोकांचाच सहभाग असे. मात्र, आता सांगलीकरांनी मोठ्या प्रमाणात मतदार नोंदणी करून ही मक्तेदारी मोडून काढली आहे. भविष्यात शिक्षणपद्धतीत आमूलाग्र बदल होणार आहेत, जे बहुजन समाजाच्या हिताचे नाहीत. आपल्याला वंचित, दबलेले व बहुजन मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी शिक्षणाची दारे खुली करणे आवश्यक आहे.”
ते पुढे म्हणाले,
“परदेशात एक विद्यार्थी जरी शिक्षणासाठी जात असेल तर त्याच्यासाठी रेल्वे सुरू केली जाते, एवढं शिक्षणाला तिथे महत्त्व आहे. पण आपल्या देशात २० विद्यार्थ्यांखाली पटसंख्या असेल तर शाळा बंद केल्या जातात, हे अत्यंत घातक आहे. या स्थितीत बदल व्हावा यासाठी विचारशील लोक विधिमंडळात गेले पाहिजेत.”
प्रवक्ते संतोष पाटील यांनी नोंदणी अभियान राबवल्याबद्दल प्रा. कांबळे यांनी शुभेच्छा दिल्या.
यावेळी शंभूराज काटकर  म्हणाले,
“मा. प्रवक्ते संतोष पाटील हे दलित, वंचित व बहुजन समाजासाठी सातत्याने कार्यरत आहेत. त्यांनी राबविलेल्या या अभियानातून समाजात जागरूकता निर्माण होईल. आगामी निवडणुकीत ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने नोंदणी करून आधार कार्ड, डिग्री सर्टिफिकेट, फोटो व गॅझेटेड ऑफिसरची सहीसह अर्ज सादर करावा. ज्यांना फॉर्म भरता येत नाही, त्यांनी ऑनलाईन माध्यमातून नोंदणी करावी,” असे आवाहन त्यांनी केले.
प्रवक्ते संतोष पाटील म्हणाले,
“2026 च्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीत सांगली जिल्ह्यातून सर्वाधिक मतदार नोंदणी करून महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजयी करणे हे आमचे उद्दिष्ट आहे.”
कार्यक्रमाचे स्वागत अनमोल पाटील यांनी केले, तर आभार प्रा. नंदकुमार सुर्वे यांनी मानले. या वेळी दत्तात्रय पाटील, महादेव शेळके, रोहित अंगडगिरी, श्रीकांत कोळीगीरी, एम. के. कोळेकर, खुदबुद्दीन मुजावर, स्वप्निल शेटे, सुशांत कदम, ज्ञानेश्वर केंगार, प्रदीप भोसले, अनुराधा शेटे, प्रणव शेळके आदी मान्यवर उपस्थित होते. शेवटी सर्वांनी “संतोष पाटील, आप आगे बढ़ो — हम तुम्हारे साथ हैं!” अशा घोषणा दिल्या.
















































