सेवा पंधरवड्यानिमित्त पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते विविध शासकीय योजनांचे लाभार्थ्यांना पत्र वाटप
राधानगरी (विनायक जितकर) – राधानगरी तालुक्यातील नरतवडे येथे महसूल विभागाच्या “सेवा पंधरवडा” उपक्रमांतर्गत राधानगरी व कागल तालुक्यात विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांना नियुक्तीपत्रे, मंजुरीपत्रे व प्रमाणपत्रांचे वाटप सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला जिल्ह्याचे पालकमंत्री मा. प्रकाश आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीने विशेष मार्गदर्शन लाभले.
यावेळी बोलताना पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले की, “महसूल विभाग हा थेट जनतेच्या संपर्कात असणारा विभाग आहे. शासनाचे प्रत्येक लाभ, योजना आणि सुविधा या जनतेच्या दारी पोहोचाव्यात, हीच या सेवा पंधरवड्याची खरी भावना आहे.” ते पुढे म्हणाले, “राज्य सरकारने सर्वसामान्य नागरिकांच्या हितासाठी अनेक योजना राबवल्या आहेत. त्या योजनांचा लाभ प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत पोहोचवणे ही प्रत्येक अधिकाऱ्याची आणि कर्मचाऱ्याची जबाबदारी आहे. शासन आणि जनता यांच्यातील दुवा म्हणून महसूल विभागाने कार्य करावे.” यावेळी त्यांनी अधिकारी, कर्मचारी यांचे विशेष कौतुक करताना सांगितले की, “सेवा पंधरवडा हा फक्त औपचारिक कार्यक्रम नसून, तो लोकसेवेचा उत्सव आहे. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत न्याय मिळवून देणे, हेच आपल्या कार्याचे खरे यश आहे.” पालकमंत्री आबिटकर यांनी ग्रामपातळीवर अधिकाधिक जनजागृती करून सर्वसामान्य नागरिकांना शासन योजनांचा थेट लाभ मिळवून देण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले.
यावेळी प्रसाद चौगुले प्रांताधिकारी राधानगरी कागल, अरुण जाधव अध्यक्ष संजय गांधी निराधार समिती, नंदकिशोर सूर्यवंशी, अनिता देशमुख तहसीलदार राधानगरी, अमरदीप वाकडे तहसीलदार कागल, डॉ संदीप भंडारे गट विकास अधिकारी राधानगरी, कुलदीप बोंगे गट विकास अधिकारी कागल, अतिश वाळुंज मुख्य कार्यकारी अधिकारी नगरपालिका मुरगुड, प्रियांका भवार सहाय्यक वनसंरक्षक, विशाल पाटील आर एफ ओ राधानगरी, राजेंद्र घुणकीकर आर एफ ओ दाजीपूर, ओमकार डांगे उपकार्यकारी अभियंता राधानगरी, राजेंद्र कुमार शेट्टी तालुका आरोग्य अधिकारी, सौरभ तुपकर उपाधीक्षक भूमी अभिलेख कागल, रामचंद्र देवकाते उपाधीक्षक भूमी अभिलेख राधानगरी, कुंडलिक पाटील, सुजाता राजेंद्र पाटील, मंडळ अधिकारी, वन विभाग अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, सामाजिक कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंदा शिंदे राशिवडेकर, तर आभार विद्या सूर्यवंशी पाटील यांनी मानले. या उपक्रमाद्वारे शासनाच्या विविध योजनांचा लाभ थेट जनतेच्या दारी पोहोचवण्याचा उद्देश साध्य होत असल्याने उपस्थितांनी व लाभार्थांनी समाधान व्यक्त केले.