भागीरथी महिला संस्थेतर्फे खासदार महोत्सवांतर्गत मंगळवारी रंगणार १० हजार महिलांची झिम्मा फुगडी स्पर्धा, ५ लाखांची बक्षिसे, विविध मालिकेतील कलाकारांची हजेरी
भागीरथी झिम्मा फुगडी स्पर्धेसाठी रिल बनवण्याचीही स्पर्धा
कोल्हापूर :
धनंजय महाडिक युवाशक्ती प्रेरित भागीरथी महिला संस्थेच्यावतीने खासदार महोत्सवांतर्गत मंगळवारी झिम्मा फुगडी स्पर्धा रंगणार आहे. या स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला असून, स्पर्धेसाठी १० हजार महिलांनी नाव नोंदणी केली आहे. या स्पर्धेला प्रसिध्द मराठी कलाकार प्राजक्ता माळीसह एकाहून एक सरस कलाकारांची उपस्थिती लाभणार आहे. तसेच या स्पर्धेचे चॅनेल बी वरून आणि युटयूबद्वारे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.
पारंपारिक लोककलेचे संवर्धन करण्याच्या हेतुने, भागीरथी महिला संस्थेतर्फे झिम्मा फुगडी स्पर्धा घेतली जाते. यावर्षी भागीरथी महिला संस्थेसह भागीरथी युवती मंच, भागीरथी नागरी पतसंस्था आणि भाजपच्यावतीने खासदार महोत्सवांतर्गत मंगळवारी ही स्पर्धा रंगणार आहे. लाईन बाजार शेजारील महासैनिक दरबार हॉलमध्ये होणार्या स्पर्धेला कोल्हापूर जिल्हयासह शेजारील जिल्हयातून आणि कर्नाटक तसेच कोकणातून महिलांचा उदंड प्रतिसाद मिळाला. स्पर्धेसाठी १० हजार महिलांनी नाव नोंदणी केली आहे. स्पर्धेची तयारी पूर्ण झाली आहे.
या स्पर्धेसाठी अभिनेत्री प्राजक्ता माळी यांच्यासह नुकताच प्रदर्शित झालेल्या हॅलो कदम चित्रपटातील अभिनेत्री आणि कोल्हापूरच्या कन्या श्वेता कामत, कलर्स मराठी वाहिनीवरील पिंगा ग पोरी पिंगा या मालिकेतील शाश्वती पिंपळकर आणि प्राजक्ता परब, अशोक मा. मा. या मालिकेतील रसिका वखारकर, इंद्रायणी मालिकेतील कांची शिंदे, क्षमा देशपांडे, सन मराठी टिव्हीवरील जुळली गाठ गं या मालिकेतील अभिनेत्री सुरेखा कुडची तसंच स्टार प्रवाहवरील हळद रूसली कुंकू हसलं या मालिकेतील समृध्दी केळकर आणि अभिषेक रहाळकर तसेच कलर्स मराठी वाहिनीवरील आई तुळजाभवानी या मालिकेतील सोनाली पाटील, पुजा काळे, अमृता धोंगडे आणि कादंबरी माळी या स्पर्धेला भेट देवून महिलांशी संवाद साधणार आहेत. त्याचबरोबर या स्पर्धेच्या निमित्ताने पारंपारिक खेळांचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोचावा, यासाठी रिल कॉम्पिटिशन आयोजित करण्यात आले आहे. स्पर्धेचे उत्तम रिल बनवणार्या स्पर्धकांना अनुक्रमे ७ हजार, ५ हजार, ३ हजार आणि १ हजार रुपयांचे बक्षिस दिले जाणार आहे.
स्पर्धेचे प्रायोजक म्हणून गजानन गंगाराम पेडणेकर ज्वेलर्स, जिजाई मसाले आणि काले बजाज चेतक काम पाहत आहेत. आज महासैनिक दरबार हॉलवर या स्पर्धेची तयारी पूर्ण झाली असून,सौ. अरूंधती महाडिक यांनी याबाबतची पाहणी केली.
दरम्यान खासदार धनंजय महाडिक यांनीही स्पर्धेच्या तयारीची पाहणी केली. या स्पर्धेच्या माध्यमातून हजारो महिलांसाठी आनंदाची पर्वणी उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान सकाळी ९ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत ही स्पर्धा रंगणार असून, या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण बी चॅनेलच्या 532 क्रमांकाद्वारे आणि युटयूबवर पाहता येणार आहे.