इंजिनियर्स डे कार्यक्रमात बोलताना ‘वायर सम्यक’ स्टार्टअपचे अध्यक्ष तुलसीदास साळुंखे, उपस्थित विद्यार्थी
गारगोटी : युवा ग्रामीण विकास संस्था संचलित श्री.आनंदराव आबिटकर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमध्ये 15 सप्टेंबर रोजी ‘ इंजिनिअर्स डे’ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून ‘इंजिनिअर्स डे’ कार्यक्रमाला सुरुवात झाली. याप्रसंगी विशेष निमंत्रित ‘वायर सम्यक’ स्टार्टअपचे अध्यक्ष तुलसीदास साळुंखे, मेनन अँड मेनन इंजिनिअरिंगचे प्लांट इन्चार्ज संतोष रंगरेज प्रमुख उपस्थित होते.
यावेळी बोलताना तुलसीदास साळुंखे यांनी वैयक्तिक अनुभवातून स्टार्टअप सुरू करण्याचा धाडसी निर्णय ते यशस्वी उद्योजक असा प्रवास उपस्थिततांसमोर मांडला. “विद्यार्थ्यांनी नवीन कल्पनांना प्रत्यक्ष स्वरूप देऊन केवळ नोकरीच्या मागे न लागता नवउद्योजक होण्यासाठी प्रयत्न करावेत”, असे आवाहन केले. तसचे मेनन अँड मेनन इंजिनिअरिंगचे प्लांट इन्चार्ज संतोष रंगरेज यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कॉलेजचे प्राचार्य डॉ. अमर चौगुले यांनी अभियांत्रिकी क्षेत्राचे राष्ट्राच्या विकासामध्ये योगदान या विषयावर बहुमोल मतप्रदर्शन केले. “आजचे विद्यार्थी उद्याचे राष्ट्रनिर्माते अभियंते आहेत. अभियांत्रिकी शिक्षणाबरोबर कौशल्य विकास या सूत्राद्वारे एक सक्षम भारत निर्माण होईल” असे प्रतिपादन त्यांनी केले.
उद्योजकता विकास, तांत्रिक क्षेत्रात होणारे बदल या विषयांच्या अनुषंगाने यावेळी विचारांचे आदान प्रदान झाले. व्याख्याने आणि विविध उपक्रमांमुळे आत्मविश्वास वाढल्याचे विद्यार्थ्यांनी याप्रसंगी नमूद केले. या कार्यक्रमासाठी संस्थेचे धीरज देसाई, धीरज गुदगे यांनी प्रोत्साहन दिले. सर्व उपक्रमांचे नियोजन प्रा.अनिल नार्वेकर, प्रा.हेमंत शिंदे व प्रा. मंजुनाथ पाटील यांनी केले. प्रास्ताविक प्रा.तेजस्विनी कदम यांनी केले. प्रा. सचिन सनदी यांनी आभार प्रदर्शन केले. यावेळी विभागप्रमुख, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी विद्यार्थिनी, प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.