सप्टेंबर महिन्याच्या दुसऱ्या सोमवारी (दि.८ रोजी) महावितरणचा ग्राहक मेळावा
जिल्ह्यातील वीज ग्राहकांनी लाभ घेण्याचे आवाहन
कोल्हापूर,: महावितरणतर्फे दिल्या जाणाऱ्या विविध सेवा व सुविधांच्या अनुषंगाने ग्राहकांच्या तक्रारी असल्यास त्या तक्रारीचे निरसन वेळेत करण्यासाठी मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत उपविभागीय स्तरापर्यंतचे ग्राहक मेळावे घेण्याचे निर्देश मा.सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिल्या आहेत. सप्टेंबर महिन्याचा ग्राहक मेळावा सोमवार (दि.८ रोजी) जिल्ह्यातील सर्व शाखा कार्यालयापर्यंत होणार असून याचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणच्या कोल्हापूर मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता गणपत लटपटे यांनी केले आहे.
महावितरणने कोल्हापूर परिमंडलाचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर यांच्या मार्गदर्शनात जुलै महिन्यात घेतलेल्या मेळाव्याचा ६१२ ग्राहकांनी तर ऑगस्ट महिन्यात घेतलेल्या मेळाव्याचा १४४० ग्राहकांनी लाभ घेतला आहे. महावितरण महिन्याच्या प्रत्येक दुसऱ्या सोमवारी सकाळी १०.०० ते दुपरी ०१.३० पर्यंत शाखा कार्यालय स्तरापर्यंतचे ग्राहक मेळावे घेत आहे. तसेच सोमवारी शासकीय सुट्टी असेल तर पुढील कार्यालयीन दिवशी सदरचा ग्राहक मेळावा आयोजित करण्यात येतो. महावितरणकडून या तक्रारी प्राधान्याने जागेवर सोडवण्यात येतात. ग्राहकांनी सदरच्या ग्राहक मेळाव्या मध्ये सहभागी होऊन आपले तक्रार अर्ज सादर करणेबाबत आवाहन महावितरणद्वारे करण्यात आले आहे.
या मेळाव्यात ग्राहकांच्या विविध शंकांचे निरसन प्रात्यक्षिकांसह करण्यात येणार आहे. यावेळी ग्राहकांना नवीन विद्युत पुरवठा देणे, ग्राहकांचा वीज भार वाढवणे अथवा कमी करणे, प्रधानमंत्री सूर्यघर योजना, शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा देणेकरीता मागेल त्याला सौर कृषी पंप योजना, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आदी उपयुक्त योजनांची माहितीही देण्यात येईल.














































