कोल्हापूर : गणपती विसर्जनाच्या जल्लोषात आज रंकाळा तलावावर घडलेली एक घटना हजारो भाविकांच्या डोळ्यात आदर, आश्चर्य आणि अभिमानाचे अश्रू आणणारी ठरली.घरगुती गणपती विसर्जन सुरू असतानाच, एक वृद्ध महिला अचानक पाण्यात पडल्या. क्षणात जीव धोक्यात गेला असता; पण देवासारख्या दोन देवदूतांनी त्या आजींना वाचवले. हे देवदूत म्हणजेच *‘व्हाईट आर्मी’*च्या दोन तरुण स्वयंसेविका – साक्षी गोरे आणि सानिका पवार.
या दोन्ही मुलींनी क्षणाचाही विलंब न करता थेट पाण्यात झेप घेतली. त्यांनी आजींना बाहेर काढून लगेचच सीपीआर देत कृत्रिम श्वासोच्छ्वास सुरू केला. तेवढ्यात अग्निशमन दलाची टीम धावून आली आणि सर्वांच्या संयुक्त प्रयत्नातून आजींना शुद्धीवर आणून रुग्णालयात दाखल करण्यात आले.

आज, २ सप्टेंबर दुपारी १ वाजता घडलेल्या या प्रसंगाने रंकाळा परिसर थरारला, मात्र त्याचवेळी व्हाईट आर्मीच्या मुलींनी दाखवलेले धाडस पाहून सर्वजण स्तब्ध झाले.
एकीकडे भाविक देवाला निरोप देत होते, तर दुसरीकडे दोन मुली ‘माणूस म्हणजे देव’ याचा प्रत्यक्ष प्रत्यय देत होत्या. आज एका वृद्ध महिलेचा जीव वाचला आणि कोल्हापूरने पुन्हा एकदा पाहिले –की ‘व्हाईट आर्मी’ म्हणजे केवळ गणपती विसर्जनाची व्यवस्था नव्हे, तर खरी सामाजिक सेवा, तत्परता आणि धाडसाचा जीवंत आदर्श आहे.
रंकाळा तलावावर जमलेल्या नागरिकांनी या मुलींच्या शौर्याला टाळ्यांचा कडकडाट देत सलाम केला. आता संपूर्ण शहरभर, सोशल मीडियावर आणि प्रत्येकाच्या तोंडी फक्त एकच कौतुक आहे –
“साक्षी गोरे आणि सानिका पवार, तुम्ही खर्या अर्थाने कोल्हापूरचा अभिमान आहात!
पाँझिटीव्ह वाँच युथ असोसिएशनची कौतुकाची थाप
“धाडस, समयसूचकता आणि सेवाभाव – हेच ‘व्हाईट आर्मी’चे खरे बळ आहे. साक्षी गोरे आणि सानिका पवार यांचं धाडसी कार्य आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. कोल्हापूरच्या भूमीत असे जीव वाचवणारे देवदूत आहेत, हीच खरी अभिमानाची गोष्ट. पाँझिटीव्ह वाँच युथ असोसिएशनतर्फे ‘व्हाईट आर्मी’ला आमचा मनापासून सलाम व कौतुकाची थाप!”
|