पदकविजेत्यांच्या गौरवाने पुण्यात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा, – रोख बक्षिस हे खेळाडूंच्या कष्टाला दिलेली दाद- उपमुख्यमंत्री अजीत पवार
-नवे क्रीडा धोरण लवकरच विकसीत करणार- क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे – शिवछत्रपती क्रीडा संकुलात देशातील पहिले ऑलिम्पिक संग्रहालय निर्माण होणार
पुणे : आंतरराष्ट्रीयसह राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील ३३१ पदकविजेत्यांना रोख पारितोषिकाने गौरवित करून पुण्यात जल्लोषात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात आला. खेलो इंडियासह आंतरराष्ट्रीय खेळाडूंसाठी ५८ कोटीचा अतिरिक्त निधी मंजुर करून रोख बक्षिसे ही खेळाडूंना कष्टाला दिलेली दाद असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले.
पुण्यातील म्हाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलातील वेटलिफ्टिंग सभागृहात महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आयोजित राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त उपमुख्यमंत्री , महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांच्या हस्ते रोख पारितोषिकाने १३ आंतरराष्ट्रीय, ३१८ राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी मिशन लक्ष्यवेध हाय परफॉर्मन्स सेंटरच्या लोगोचे अनावरण पवार व क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ऑलिम्पिक पदक विजेता स्वप्नील कुसाळे, आमदार बाबाजी काळे, क्रीडा आयुक्त शीतल तेली-उगले, सहसंचालक सुधीर मोरे, नामदेव शिरगांवकर, संजय शेटे आदी मान्यवर उपस्थित होते.
सलग दुसऱ्यांदा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदकांचे व्दिशतक झळकावून महाराष्ट्राच्या खेळाडूंनी अभिमानास्पद कामगिरी केली असे सांगून उपमुख्यमंत्री अजीत पवार पुढे म्हणाला की, महाराष्ट्राच्या १३ कोटी जनतेच्या वतीने खेळाडूंचे कौतुक होत आहे. रोख पारितोषिके ही त्यांच्या कष्टाला, योगदानाला दिलेली दाद आहे.
खेलो इंडियासह इतर खेळाडूंच्या बक्षीसांसाठी ५८ कोटी अतिरिक्त निधी देण्याची क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांची मागणीही आपल्या भाषणात पवार यांनी मंजुर केली. बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात देशातील पहिले ऑलिम्पिक संग्रहालय उभा करण्याचा निर्णय घेतला आहे. खेळाडूंना संस्कार देणारे केंद्र हे संग्रहालय असेल असेही अजित पवार आपल्या भाषणात म्हणाले.
आरोग्यदायी महाराष्ट्र, क्रीडामय महाराष्ट्र हे आमचे ध्येय आहे असे सांगून असे क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे पुढे म्हणाले की, महाराष्ट्राचे राज्याचे नवे क्रीडा धारेण लवकरच विकसीत करणार आहे. खेळाडुंचा न्याय देणारे नवे क्रीडाधोरण असेल. यातून आंतरराष्ट्रीय,ऑ.लिम्पिकमध्ये महाराष्ट्रचे खेळाडू अधिकाधिक पदके जिंकतील.
उत्तराखंड येथे फेबुवारीत संपन्न झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रने गौरवशाली कामगिरी केली होती. ५५ सुवर्ण, ७० रौप्य व ७६ कांस्य अशी एकूण २०१ पदके पटकावून, सहभागी राज्यांमध्ये प्रथम क्रमांक संपादन केला. या स्पर्धेतील ३१८ पदकविजेत्या खेळाडूंचा गौरवित करण्यात आले. सुवर्ण, रौप्य व कांस्य पदकविजेत्यांना अनुकमे रू. ७, ५, ३ लाख रोख बक्षिस देण्यात आली राज्याच्या क्रीडा धोरण-२०१२ नुसार,राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय खेळाडू व मार्गदर्शकांना रु.२८.७० कोटी रकमेची रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात करण्यात आला.
वार्षिक रु.१६० कोटी इतका खर्च असलेल्या मिशन लक्ष्यवेध या महत्वाकांक्षी योजनेचा शुभारंभही आज करण्यात आला. पहिल्या टप्प्यातील सहा क्रीडा प्रकारांच्या प्रशिक्षण योजनेचा शुभांरभ शुक्रवारी होईल. यामध्ये ॲथलेटिक्स, हॉकी, कुस्ती, वेटलिफ्टिंग, रोईंग व लॉन टेनिस खेळाचा समावेश करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक क्रीडा आयुक्त शीतल तेली-उगले यांनी केले. आभार सहसंचालक सुधीर मोरे यांनी मानले.















































