काेल्हापूरः (राजेश वाघमारे)
मनपा टेंबलाईवाडी विद्यालय शाळा क्र. ३३ येथे ७९ वा स्वातंत्र्यदिन मोठ्या थाटामाटात, देशभक्तीच्या वातावरणात आणि भावनिक रंगमंचावर साजरा करण्यात आला. पहाटेपासूनच शाळेच्या आवारात विद्यार्थ्यांची लगबग सुरू झाली होती. तिरंग्याच्या रंगात नटलेले गणवेश, देशभक्तीच्या गाण्यांनी दुमदुमणारे वातावरण आणि उत्साही चेहरे या सगळ्यांनी शाळेचा परिसर एखाद्या लहान भारतमातेसारखा उजळून निघाला.
मान्यवर पाहुणे म्हणून माजी नगरसेवक प्रवीण केसरकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष दिलीप शिरगावे, केंद्र मुख्याध्यापक विलास पिंगळे यांच्यासह समिती सदस्य, सामाजिक कार्यकर्ते आणि पालक मोठ्या संख्येने या सोहळ्यास साक्षीदार ठरले. माननीय केसरकर यांच्या हस्ते संपन्न झालेल्या ध्वजारोहणाच्या क्षणी विद्यार्थ्यांनी दिलेला राष्ट्रगीताचा जयघोष संपूर्ण परिसर भारावून टाकणारा होता.
यानंतर बालचमूनी सादर केलेल्या संचलनाने शिस्त, एकता आणि देशभक्तीचा आदर्श उभा केला. अशोक गावडे सरांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी काढलेले संचलन पाहताना उपस्थित प्रत्येकाच्या मनात अभिमानाची भावना दाटून आली.
कार्यक्रमाची खरी रंगत मात्र सांस्कृतिक सादरीकरणात खुलली. तब्बल १५१ मुलींनी रंगीबेरंगी पोशाखात एकसुरात सादर केलेले नृत्य पाहून पालक, शिक्षक आणि पाहुणे क्षणभर भारावून गेले. “तुफान” या गीतावर लेझीम पथकाने सादर केलेली झंकार वातावरणात उत्साहाचा प्रचंड तुफान घेऊन आली. या सगळ्या उपक्रमामागे प्रभाकर लोखंडे सरांचा परिश्रम आणि विद्यार्थ्यांचा अपार जोश दिसून आला.

“आज मी पहिल्यांदाच ध्वजारोहण सोहळ्यात सहभागी झाले. राष्ट्रगीत म्हणताना अंगावर काटा आला. मला खूप अभिमान वाटला,” असे एका विद्यार्थिनीने सांगितले.
“मुलांच्या चेहऱ्यावरचा उत्साह पाहून डोळ्यात पाणी आले. आम्ही आमच्या पिढीत इतकं काही अनुभवलं नाही, पण शाळेने मुलांना दिलेलं हे व्यासपीठ अभिमानास्पद आहे,” अशी भावना एका पालकांनी व्यक्त केली.
“विद्यार्थ्यांनी जेवढ्या शिस्तबद्ध आणि जोशात सादरीकरण केलं, तेवढाच आम्हाला शिक्षक म्हणून समाधानाचा आणि अभिमानाचा क्षण आहे,” असे शिक्षकांनी सांगितले.
अखेरीस संपूर्ण शाळा “वंदे मातरम्” आणि “भारत माता की जय” च्या घोषणांनी दुमदुमून गेली. तिरंग्याखाली उभ्या असलेल्या हजारो डोळ्यांत अभिमान, आनंद आणि स्वातंत्र्याचा भाव एकवटलेला होता. या सोहळ्याने प्रत्येकाच्या मनात पुन्हा एकदा देशभक्तीचा दीप उजळला.

|