स्वातंत्र्यदिना दिवशी सायबर सुरक्षिततेबाबत जनजागृत
कोल्हापूर:(शितल डोंगरे) : इंटरनेटचा वाढता वापर आणि त्यासोबत वाढणारे सायबर गुन्हे थोपवण्यासाठी कमला महाविद्यालय, कोल्हापूर व क्विक हिल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सायबर शिक्षा फॉर सायबर सुरक्षा’ हा उपक्रम राबवला जात आहे. या उपक्रमाचा उद्देश समाजात सायबर सुरक्षिततेबाबत जनजागृती करणे असून, यावर्षी महाविद्यालयातील माहिती तंत्रज्ञान विभागाच्या बी.सी.ए. शाखेतील 20 विद्यार्थ्यांची ‘सायबर वॉरियर्स’ म्हणून निवड करण्यात आली आहे.
सायबर वॉरियर्स कोल्हापूर शहर व परिसरातील शाळा व महाविद्यालयांमध्ये जाऊन कार्यशाळा घेत असून विद्यार्थ्यांना सायबर सुरक्षेबाबत मार्गदर्शन करत आहेत. कार्यशाळांमध्ये फिशिंग, डिजिटल अरेस्ट, आर्थिक फसवणूक, सोशल मीडियावरील वैयक्तिक माहितीचा गैरवापर अशा गंभीर सायबर गुन्ह्यांबाबत माहिती दिली जाते. त्याचबरोबर अनोळखी मेसेज वा लिंकवर क्लिक न करणे, वैयक्तिक माहिती शेअर न करणे, तसेच सायबर गुन्ह्यांची नोंदणी कशी करावी याबाबत विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष उदाहरणांसह मार्गदर्शन केले जाते.
सायबर गुन्ह्यांपासून बचावासाठी 1930 हा हेल्पलाइन क्रमांक लक्षात ठेवण्याचे आवाहनही या उपक्रमातून करण्यात येत आहे. मोबाईलचा अतिरेकी वापर केल्यामुळे निर्माण होणारी मानसिकता, ताणतणाव व चिडचिडेपणा याबाबतही विद्यार्थ्यांना जागरूक केले जात आहे.
तसेच या विद्यार्थिनींनी स्वातंत्र्यदिना दिवशी पथनाट्यद्वारे लोकांपर्यंत हा संदेश पोहोचवला आहे.
या उपक्रमाला शाळा व महाविद्यालयांतून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, विद्यार्थी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवत आहेत. या वेळी अध्यक्षा अनुपमा काटकर, अजय शिर्के सर, गायत्री केसकर व दिपू सिंग यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.