प्रत्येकाने जबाबदारी घेवून महापालिकेच्या कामकाजात सुधारणा करा : क्षीरसागर यांच्या महापालिका अधिकाऱ्यांना सूचना
कोल्हापूर : कोल्हापूर शहराच्या विकासासाठी जीव तोडून काम करायचे, निधी आणायचा पण, अधिकाऱ्यांच्या कामातील हलगर्जीपणा मुळे कामे रखडली जातात. शहरवासीयांच्या प्रत्येक प्रश्नांना सामोरे जाताना अधिकाऱ्यांची अकार्यक्षमता दिसून येते. नागरिकांच्या संयमाचा अंत पाहू नका. महापालिकेच्या कामाला शिस्त लावा, अन्यथा शहर विद्रूप होण्यास वेळ लागणार नाही. चांगले काम केले तर आपले नांव उदाहरण म्हणून देता आले पाहिजे, अशी काम करण्याची तळमळ ठेवा. प्रत्येकाने जबाबदारी घेवून गांभीर्याने महानगरपालिकेच्या कामकाजात सुधारणा करा, अशा सक्त सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी आयुक्त तथा प्रशासक के.मंजूलक्ष्मी उपस्थित होत्या.
महानगरपालिका अंतर्गत सुरु असलेली विकास कामे, नागरिकांचे विविध प्रश्न यांचा आढावा घेण्यासाठी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली आयुक्त कार्यालयात आढावा बैठक आज पार पडली. यावेळी आमदार राजेश क्षीरसागर यांनी केलेल्या प्रश्नांच्या सरबत्तीसमोर अधिकारी निरुत्तर राहिले.
यानंतर बोलताना ते पुढे म्हणाले, महापालिकेतील रिक्त पदांमुळे कामकाजावर विपरीत परिणाम होत आहे. आवश्यक आकृतिबंध पूर्ण करूनही मनुष्यबळ कमी पडत असेल तर मनुष्यबळ उपलब्ध करणे गरजेचे असल्याचे सांगितले. यावर आयुक्त के.मंजूलक्ष्मी यांनी, ३५० पदे आवश्यक असून, सेवा प्रवेश नियम मंजुरीचा प्रस्ताव शासनाकडे पाठविला असल्याचे सांगितले. यावर आमदार राजेश क्षीरसागर नगरविकास विभागाच्या उपसचिव श्रीमती पोवार यांच्याशी संपर्क साधून सदर प्रस्तावास मान्यता देण्याबाबत सूचना दिल्या.
शहरातील ओपन स्पेस महानगरपालिकेच्या ताब्यात नसल्याने पार्किंग, क्रीडांगणे, उद्याने अशा सुविधा अपुऱ्या पडत आहेत. हे ओपन स्पेस तात्काळ महानगरपालिकेच्या ताब्यात घेवून त्या ठिकाणी नागरिकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात याव्यात. घरफाळा विषय गंभीर बनला असून, ड्रोनद्वारे सर्व्हेक्षण करून घरफाळा योग्य दरात लागू करण्याच्या सूचना दिल्या. पाणी पुरवठा विभागाचा कारभार अत्यंत ढिसाळ असून, रोज शहरात कुठे ना कुठे रास्ता रोको होत आहे. याकडे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. शहरवासियांना मुबलक पाणी पुरवठा व्हायलाच पाहिजे. पाणी चोरीच्या घटनांवर तात्काळ कारवाई करा. पाणी वाटपात असमानता ठेवू नका. पाणी वाटपातील राजकारण थांबवा, अशा सक्त सूचना दिल्या.
ठोक मानधन व कंत्राटी कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्याप्रमाणे शासनाकडून वेतन मंजूर होते. परंतु, ठेकेदार त्यातील निम्मे वेतन कर्मचाऱ्यांना देवून त्यांची आर्थिक लुट करत असल्याची तक्रार वारंवार येत आहे. अशा कंत्राटदारांची मनमानी खपवून घेवू नका. कर्मचाऱ्याना त्यांच्या हक्काचे किमान वेतन कायद्याने मंजूर झालेले वेतन देण्याच्या सूचना ठेकेदारांना द्या. यासह मागील वेतन कपातीचा फरकही तात्काळ देण्याच्या सूचना द्या अन्यथा कर्मचाऱ्यांची आर्थिक लुट करणाऱ्या ठेकेदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करा.

यासह बफर झोन मधील रहिवासी नागरिक व सेवा रुग्णालय इमारतीसाठी योग्य तो निर्णय तात्काळ घेण्यात यावा. सरस्वती टॉकीज, मध्यवर्ती बसस्थानक, गाडी अड्डा याठिकाणी पार्किंग सुरु करण्यासाठी तातडीने निविदा प्रसिद्ध करा. रंकाळा येथील म्युझिकल फौउंटेन साठी निधी मंजूर असून त्याचेही काम तात्काळ सुरु करा. शहरातील चौक, उद्याने, महापालिका शाळा, दवाखाने सी.एस.आर. निधीतून विकसित करण्यासाठी प्रयत्न सुरु असून, आवश्यक प्रस्ताव तात्काळ सादर करण्याची सूचनाही यावेळी आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिल्या.
या बैठकीस उपायुक्त दरेकर, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शहरअभियंता हर्षजीत घाटगे, नगररचना विभागाचे मस्कर आदी सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते.