शेतकऱ्यांचा अभिमानास्पद तिरंगा आंदोलन!

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

 – शक्तीपीठ महामार्गाचा पर्यायी मार्ग हवा, शेतात नाही

शिराेली- कोल्हापूर -( रुपेश आठवलेः)
कोट्यवधींच्या शक्तीपीठ महामार्गावरून शेतकऱ्यांच्या असंतोषाचा सूर पुन्हा एकदा उमटला आहे. मात्र यावेळी आंदोलनाचा चेहरा रोषाचा नसून राष्ट्राभिमानाचा असेल! स्वातंत्र्य दिनानिमित्त शेतकऱ्यांनी आपल्या शेतात तिरंगा झेंडा फडकवत सरकारला शांततेने, ठामपणे संदेश द्यायचा निर्णय घेतला आहे – “तिरंगा झळकतोय आमच्या शेतात… पण शक्तीपीठ नको आमच्या वावरात!”

शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली १२ जिल्ह्यांतील शेतकरी एकत्र आले असून, हे आंदोलन अहिंसक आणि लोकशाही मार्गाने होणार आहे. १५ ऑगस्ट रोजी संबंधित शेतजमिनींमध्ये तिरंगा फडकावून शेतकरी आपला विरोध नोंदवतील. याच वेळी ग्रामसभांमध्ये ठराव आणि गावागावात सह्यांची मोहीम देखील राबवण्यात येणार आहे.


“महामार्ग हवा – पण शेतजमीन वाचवूनच!”

या आंदोलनाचा उद्देश हा महामार्गाला विरोध करण्याचा नसून, तो शेतीवर न आणता पर्यायी मार्गावर न्यावा ही शेतकऱ्यांची प्रमुख मागणी आहे. शक्तीपीठ महामार्गाचा खर्च आता ८६ हजार कोटींवरून १ लाख ६ हजार कोटींपर्यंत गेला आहे, असे सांगताना आमदार सतेज पाटील म्हणाले, “या महामार्गासाठी आमचं शेतीचं स्वातंत्र्य हिरावून घेऊ नका. त्यामुळे शेतातच तिरंगा लावून आपली मागणी नोंदवूया.”


नेते, संघटना एकवटले – जमिनीच्या हक्कासाठी

या बैठकीस माजी खासदार राजू शेट्टी, आमदार अमित देशमुख, आमदार कैलास पाटील, माजी खासदार विनायक राऊत, माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सर्वांनी एकाच सूरात सांगितले की, पिकाऊ जमिनी वाचवणं ही काळाची गरज आहे.

राजू शेट्टी म्हणाले, “आपण शेतजमिनीला खरं स्वातंत्र्य मिळवून देतोय.” तर विनायक राऊत यांनी सांगितले की, “हा प्रकल्प शेतकऱ्यांच्या जीवावर नाही चालणार.” आमदार कैलास पाटील यांनीही जोरदार शब्दांत प्रश्न उपस्थित केला, “हा ड्रीम प्रोजेक्ट आहे की क्रीम प्रोजेक्ट?


संगठित लढा – सह्यांपासून संसदेपर्यंत!

कोल्हापूर दक्षिणमधील दहा गावांतून जाणाऱ्या महामार्गाविरोधात माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली तीन दिवसांत सह्यांची व्यापक मोहीम राबवली जाणार आहे. याशिवाय, १३ ऑगस्ट रोजी संयुक्त किसान मोर्चाच्या देशव्यापी आंदोलनात सुद्धा शक्तीपीठ विरोधक सहभागी होणार आहेत.


शांततेने, अभिमानाने, ठामपणे – शेतकऱ्यांचा १५ ऑगस्टला अनोखा संदेश

हे आंदोलन केवळ विरोधासाठी नाही – तर पर्यायी मार्गासाठी, शेतीच्या हक्कासाठी, आणि विकास व निसर्ग यांचा समतोल राखण्यासाठी आहे. कोल्हापूरसह १२ जिल्ह्यांतील शेतकरी १५ ऑगस्टला तिरंग्याच्या साक्षीने सरकारला सांगतील –
“विकास हवा, पण शेतीच्या मुळावर नाही!”

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.