“दुसऱ्या संधीसाठीचा समाजपुरुषार्थ – नाशिकमध्ये इतिहास घडला!
अखिल भारतीय क्षत्रिय महासभेच्या पुढाकाराने देशातील पहिले विधुर-विधवा पुनर्विवाह संमेलन उत्साहात पार पडले
नाशिक |
गंगापूर रोडवरील शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी सभागृहात इतिहास घडला – सामाजिक समतेचा, नव्या सुरुवातीचा, आणि मानवी गरजांची तितकीच सुसंवेदनशील जाणीव ठेवणारा. अखिल भारतीय क्षत्रिय महासभेच्या पुढाकाराने भारतातील पहिलं विधुर, विधवा आणि घटस्फोटीतांसाठीचं पुनर्विवाह संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झालं.
या ऐतिहासिक उपक्रमात देशभरातून क्षत्रिय समाजातील विधुर, विधवा, वीरांगना आणि घटस्फोटित युवक-युवती आणि त्यांचे पालक मोठ्या संख्येने सहभागी झाले. समाजाच्या जडणघडणीसाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा या उपक्रमात “दुसरी संधी” ही केवळ संकल्पना नव्हती, ती एक वास्तविक नवजीवनाची सुरुवात होती.
कार्यक्रमाची सुरुवात शूरवीर महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलनाने झाली. सकाळी १० वाजता राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीने संमेलनाची गती मिळाली आणि त्यानंतर नवीन पदग्रहण सोहळाही पार पडला.
राष्ट्रीय उपाध्यक्ष राजेंद्रसिंह चव्हाण यांना “समाज भूषण गौरव पत्र” देऊन सन्मानित करण्यात आले. या उपक्रमाचे ते मुख्य आयोजकही होते. त्यांच्या बरोबर राष्ट्रीय अध्यक्ष महेंद्रसिंह तंवर, उपाध्यक्ष डी.पी. सिंह, महिला प्रदेशाध्यक्ष चंद्रकला सिसोदिया, महाराष्ट्र अध्यक्ष प्रा. जसपालसिंह सिसोदिया, आणि इतर अनेक मान्यवर उपस्थित होते. युवा विंगच्या डिंपल राणा यांनी युवा प्रतिनिधित्व उत्तमरित्या निभावले.
संपूर्ण सभागृहात उपस्थित प्रत्येकजण “पुनर्विवाह ही सामाजिक गरज आहे, सामाजिक कलंक नव्हे!” या विचाराच्या जागृतीने भारावून गेला. विवाह परिचय सत्रात अनेक विधुर-विधवा, घटस्फोटित व्यक्तींनी आपला परिचय सादर करत समाजातील दृष्टीकोन बदलण्याचं कार्य केलं.
सुत्रसंचालन राहुल परदेशी यांनी तर आभार प्रदर्शन महाराष्ट्र प्रदेश महामंत्री सुनिलसिंह परदेशी यांनी केलं.
कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.
> पुनर्विवाह म्हणजे केवळ नात्यांचा पुनर्जन्म नाही, तो एक समजूतदार समाजाच्या पायाभरणीचा निर्णायक टप्पा आहे.
अखिल भारतीय क्षत्रिय महासभेच्या या उपक्रमाने समाजाच्या मानसिकतेत एक सकारात्मक क्रांती घडवली आहे.