‘टक्केवारी’साठी गिळंकृत यंत्रणा!
आम आदमी पार्टीचा कोल्हापूर महापालिकेच्या भ्रष्टाचाराविरोधात नोटांचा जोरदार ‘नोटा’ निषेध
कोल्हापूर :
महापालिकेच्या ड्रेनेज प्रकल्पांतर्गत काम करणाऱ्या एका ठेकेदाराने थेट बिल मिळवण्यासाठी अधिकाऱ्यांना ‘टक्केवारी’ द्यावी लागल्याचा थरारक आरोप करत व्हॉट्सअप चॅटसह स्क्रिनशॉट सार्वजनिक केले. यात उपशहर अभियंता, कनिष्ठ अभियंता, लेखापाल, अधीक्षक ते थेट मुख्य लेखापाल आणि अतिरिक्त आयुक्तांपर्यंतच्या भ्रष्ट साखळीचा पर्दाफाश केल्याने प्रशासन हादरले आहे.
या पार्श्वभूमीवर, आम आदमी पार्टीतर्फे महापालिकेच्या मुख्य प्रवेशद्वारावर अनोख्या पद्धतीने ‘नोटा’ उधळून आणि टक्केवारीखोर अधिकाऱ्यांचे प्रतीकात्मक कचरापेटी स्वरूपातील पुतळे उभारून निषेध आंदोलन करण्यात आले.
“मी टक्केवारी खातो”, “मला पैसे खायला आवडतात”, “माझं पगारात भागत नाही” अशा उपहासात्मक मजकुरांनी सजलेल्या कचरापेट्यांनी नागरिकांचे लक्ष वेधून घेतले.
काही दिवसांपूर्वी महापालिकेच्या ठेकेदार व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये देखील 18% ‘कमिशन’शिवाय कोणतेही काम मिळणार नाही, असा मेसेज व्हायरल झाला होता. आता खुद्द ठेकेदाराने पुरावे सादर केल्यामुळे महापालिकेतील भ्रष्टाचारी रचना उघडी पडली असल्याची ठाम प्रतिक्रिया आपचे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई यांनी दिली.
निकृष्ट दर्जाचे काम करून शहराच्या विकासाची क्रूर थट्टा करणाऱ्या अधिकाऱ्यांविरोधात सुरू असलेल्या चौकशीची विश्वसनीयता संशयात आहे. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता या प्रकरणाच्या चौकशीसाठी नियुक्त करावेत, अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
या आंदोलनात आप शहराध्यक्ष उत्तम पाटील, अभिजित कांबळे, सूरज सुर्वे, समीर लतिफ, दुष्यंत माने, विजय हेगडे, प्रसाद सुतार, राकेश गायकवाड, संजय नलवडे, मयुर भोसले, लखन काझी, रमेश कोळी, चेतन चौगुले आदी पदाधिकारी उपस्थित होते.