कोल्हापूर जिल्हा म्हणजे शिवसेनाचा भक्कम बालेकिल्ला
![]() |
![]() |
कोल्हापूर (विनायक जितकर) – युवासेना प्रमुख खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते आज कोल्हापूर शहरातील शिवसेना मध्यवर्ती संपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन करण्यात आले. राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याणमंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकारातून आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने हा भव्य सोहळा अतिशय नियोजनबद्ध पद्धतीने पार पडला. कार्यक्रमाचे स्वागत व प्रस्थाविक पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.
यावेळी बोलताना पालकमंत्री आबिटकर म्हणाले, कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेची मजबूत ताकद आहे. या कार्यालयातून शिवसेनेच्या विचारधारेचा प्रचार, जनतेच्या अडचणींचे निराकरण, कार्यकर्त्यांचे मार्गदर्शन आणि संघटनात्मक बांधणी यासाठी सातत्याने कार्य होत राहील. ‘जनतेसाठी झटणं हीच खरी शिवसेना’ या बाळासाहेबांच्या विचारांची ही खरी प्रेरणा आम्ही शिवसेना नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात पुढे नेत आहोत. खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचे नेतृत्व कार्यकर्त्यांमध्ये नवी ऊर्जा निर्माण करणारे आहे. त्यांचे मार्गदर्शन सर्व पदाधिकाऱ्यांसाठी प्रेरणादायी आहे. या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने जिल्ह्यातील कार्यकर्त्यांच्या एकजुटीच्या जोरावर कोल्हापूर जिल्हा हे शिवसेनेचा भक्कम बालेकिल्ला बनवण्याचा निर्धार केला आहे.
या उद्घाटन प्रसंगी बोलताना खासदार डॉ. श्रीकांत शिंदे म्हणाले, कोल्हापूर जिल्हा म्हणजे शिवसेनाचा बालेकिल्ला आहे. या करवीर नगरीत आज शिवसेनेच्या जिल्हा मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन करताना मला विशेष आनंद होत आहे. हे केवळ कार्यालय नसून, प्रत्येक शिवसैनिकाच्या संघर्षाचे, निष्ठेचे आणि सेवाभावाचे प्रतीक आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांवर चालणाऱ्या शिवसेनेने नेहमीच जनतेच्या हक्कासाठी लढा दिला आहे. आज या जिल्ह्यात उभे राहिलेले हे कार्यालय म्हणजे जनतेशी थेट संवाद साधणारे, कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणारे आणि शिवसेनेच्या विचारधारेचा प्रसार करणारे प्रेरणास्थान ठरणार आहे. माझे वडील एकनाथ शिंदे साहेब यांनी नेहमी सांगितले की, ‘शिवसेना ही फक्त पक्ष नाही, ते एक कुटुंब आहे. हे कार्यालय या कुटुंबाचे केंद्रबिंदू बनणार आहे. मला खात्री आहे की पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या सक्षम नेतृत्वात कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेना अधिक बळकट होईल आणि कार्यकर्त्यांना न्याय मिळेल.
यावेळी आमदार चंद्रदीप नरके, माजी खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, आमदार राजेश क्षीरसागर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. आभार राधानगरी तालुका प्रमुख विजय बलुगडे यांनी मानले. करवीर नगरीत पार पडलेल्या या कार्यक्रमास शिवसेनेचे मान्यवर नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये आमदार अशोकराव माने, माजी आमदार सुजित मिणचेकर, माजी आमदार जयश्रीताई जाधव, सत्यजित कदम, शारंगधर देशमुख, जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, रवींद्र माने यांच्यासह जिल्ह्यातील तालुका प्रमुख, पदाधिकारी, शिवसैनिक, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.