गांजाची खुलेआम विक्री करणारा अटकेत; 1.90 लाखांचा मुद्देमाल जप्त
कोल्हापूर : अंमली पदार्थांच्या विरोधात सुरू असलेल्या मोहिमेत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने धडक कारवाई करत गांजाची विक्री करणाऱ्या एकास अटक केली. हुपरी परिसरातील संभाजी माने नगर झोपडपट्टी भागात खुलेआम गांजाची विक्री करणाऱ्या इसमावर पोलिसांनी सापळा रचत छापा टाकला. यावेळी त्याच्याकडून एकूण 1 किलो 600 ग्रॅम गांजा आणि इतर साहित्य असा 1.90 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एलसीबीच्या पथकाची सातत्याने सुरु असलेल्या कारवाईमुळे चाेरटे, गांजा चाेर, अंमली पदार्थ विक्री करणारे धास्तावले आहेत. तरर दुसऱ्या बाजूला एलसीबीच्या कारवाईचे समाजातून सर्व स्तरावर स्वागत हाेत आहे.
गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई दि. 25 जुलै रोजी करण्यात आली. मोहिन मौनुद्दीन मुजावर (वय 27, रा. संभाजीनगर, हुपरी, ता. हातकणंगले) या तरुणास पोलिसांनी अटक केली असून, त्याच्याविरुद्ध हुपरी पोलीस ठाण्यात NDPS कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार यांच्या आदेशानुसार व अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने केली. पथकात अंमलदार युवराज पाटील, निवृत्ती माळी, अशोक पोवार, अमित सर्जे, सागर चौगले, शुभम संकपाळ, विशाल चौगले, महेश पाटील, संजय कुंभार व अनिल जाधव यांचा समावेश होता. हुपरी पोलीस ठाणे गुन्ह्याचा पुढील तपास करत आहे.