पालकमंत्री आबिटकर यांच्या सूचनेनुसार जिल्ह्यात सर्व ठिकाणी ग्राहक मिळावे
कोल्हापूर – कोल्हापूर जिल्ह्यात महावितरणकडून वीज ग्राहकांच्या विविध तक्रारी सोडविण्याच्या हेतूने सहा विभागांत व ३० उपविभाग अंतर्गत सोमवार (दि.१४ जुलै) रोजी एकाच दिवशी ३० ठिकाणी ग्राहक मेळावे आयोजित करण्यात आले होते. या मेळाव्याचा लाभ जिल्ह्यातील ६१२ ग्राहकांनी घेतला. यापैकी ५१७ ग्राहकांच्या तक्रारींचा निपटारा जागेवर करण्यात आला. तर प्रलंबित ९५ तक्रारीं विहित वेळेत निकाली काढण्याचे आदेश कोल्हापूर मंडल कार्यालयाचे अधीक्षक अभियंता गणपत लटपटे यांनी दिले आहेत.
महावितरणतर्फे दिल्या जाणाऱ्या विविध सेवा व सुविधांच्या अनुषंगाने ग्राहकांच्या तक्रारी असल्यास त्या तक्रारींचे निरसन वेळेत होण्याच्या दृष्टीने महावितरण महिन्याच्या प्रत्येक दुसऱ्या सोमवारी विभागीय तसेच उपविभागीय स्तरावर ग्राहक मेळावे घेते. जुलै महिन्यात घेण्यात आलेल्या या मेळाव्यांत ग्राहकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत तक्रारींची सोडवणुक झाल्याबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी कोल्हापूर शहर विभागातील ९६ पैकी ८१ तक्रारी, कोल्हापूर ग्रामीण १ विभागातील १०२ पैकी १०० तक्रारी, कोल्हापूर ग्रामीण २ विभागातील १३४ पैकी ९८ तक्रारी, गडहिंग्लज विभागातील ६९ पैकी ६९ तक्रारी, इचलकरंजी विभागातील १३४ पैकी १०२ तक्रारी, जयसिंगपूर विभागातील ७७ पैकी ६७ तक्रारी जागेवर तात्काळ सोडवण्यात आल्या.
ग्राहकाने दाखल तक्रारींत प्रामुख्याने नवीन वीज जोडणी, वाढीव वीज बिले, सौर कृषी पंप, कृषिपंप ग्राहकांचा वीज भार कमी करणे, स्मार्ट टीओडी मीटरच्या तक्रारी व विविध शंका यांचा प्रामुख्याने समावेश होता. या मेळाव्यात स्मार्ट टीओडी मीटरच्या संबधीत सर्वच तक्रारींचे प्रात्यक्षिकांसह निरसण करण्यात आले. यावेळी ग्राहकांना पीएम सुर्यघर योजना, शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा देणेकरीता कुसुम बी व मागेल त्याला सौर कृषी पंप योजना, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आदी योजनांची माहितीही देण्यात आली.
ग्राहक मेळाव्यांची व्याप्ती वाढवणार – अधीक्षक अभियंता गणपत लटपटे
सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या आदेशानुसार या ग्राहक मेळाव्यांची सुरुवात करण्यात आली आहे. मुख्य अभियंता स्वप्नील काटकर यांच्या मार्गदर्शनात भविष्यात या मेळाव्यांची व्याप्ती वाढवण्याचा मानस असून, दर पंधरवड्यात ग्राहक मेळावे घेण्याचा आमचा प्रयत्न राहील. तसेच लवकरच ऑनलाईन लिंकच्या माध्यमातून ग्राहकांच्या तक्रारी तात्काळ सोडविण्यावर भर राहील असे कोल्हापूर मंडल कार्यालायचे अधीक्षक अभियंता गणपत लटपटे यांनी यावेळी सांगितले.