मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत प्लास्टीक कचरा व्यवस्थापनाला वेग… १२ पैकी ७ गावे स्वच्छतेच्या दिशेने मोठे पाऊल; उर्वरित ५ गावांनाही लवकरच प्लास्टीकमुक्त करण्याचे उद्दिष्ट
कोल्हापूर (विनायक जितकर) – जिल्ह्यात पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या पुढाकाराने मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियान राबविले जात आहे. 1 मे ते 15 ऑगस्ट 2025 या कालावधीत हे अभियान राबविले जात आहे. या अभियानांतर्गत प्रशासकीय कामात गती यावी यानुषंगाने सर्व विभागांमार्फत राबविण्यात येणा-या योजना, अभियान आणि उपक्रमांना 15 ऑगस्ट 2025 पर्यंत साध्य निश्चितीसाठी कालावधी देण्यात आला आहे. पाणी व स्वच्छता विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूर या विभागाने देखील मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानामध्ये जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील किमान 1 गाव याप्रमाणे 12 तालुक्यातील 12 गावे 15 ऑगस्ट 2025 पूर्वी प्लास्टीकमुक्त करण्याचे उद्दीष्ट निश्चित केले आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली या अभियान कालावधीत माहे जुलैपर्यंत जिल्ह्यातील 7 गावे प्लास्टीकमुक्त झाली असून उर्वरित 5 गावे माहे जुलैअखेर प्लास्टीकमुक्त करुन उद्दीष्ट 100 टक्के साध्य करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील प्लास्टीकमुक्त झालेली गावे –
वाटंगी (ता. आजरा), झांबरे (चंदगड), मुगळी (ता. गडहिंग्लज), मजरे कासारवाडा (ता. राधानगरी), गोलिवडे (ता. पन्हाळा), ऐनवाडी (ता. शाहूवाडी), फणसवाडी (ता. भुदरगड)
गावे प्लास्टीकमुक्त करण्यासाठी राबविण्यात आलेले उपक्रम – मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत जिल्हा स्तरावरुन प्लास्टीकमुक्त गावाचे उद्दीष्ट निश्चित करण्यात आले. त्यानुसार तालुका स्तरावरुन गावांची निवड करण्यात आली. या उपक्रमामध्ये करावयाच्या कालबध्द कार्यवाहीबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी सर्व गट विकास अधिकारी यांना निर्देश दिले आहेत. तालुका स्तरावर बैठकांच्या माध्यमातून या गावातील सरपंच आणि ग्रामपंचायत अधिकारी यांना गावे प्लास्टीकमुक्त करण्याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत. निवडलेल्या ग्रामपंचायतीमध्ये सर्वप्रथम मासिक ग्रामसभा आयोजित करुन एकल प्लास्टीकचा वापर थांबविण्याबाबत ठराव करण्यात आला. ग्रामस्थ, दुकानदार, व्यावसायिक, व्यापारी यांच्यामध्ये प्लास्टीकचा वापर न करण्याबाबत जनजागृती उपक्रम राबविण्यात आला. त्यानंतर गावातील सर्व व्यापारी, विक्रेते, दुकानदार यांना एकल प्लास्टीकचा वापर केल्यास दंडात्मक कारवाई होणार असल्याबाबत ग्रामपंचायतीव्दारे एकल प्लास्टीकचा वापर केल्यास दंडात्मक कारवाई होणार असल्याबाबत ग्रामपंचायतीव्दारे नोटीस देण्यात आल्या. 15 जून 2025 पासून तालुकास्तरीय अधिकारी व ग्रामपंचायत कर्मचारी यांच्या पथकाव्दारे स्थानिक दुकाने, आठवडी बाजार येथे एकल प्लास्टीक जप्त करण्याची मोहीम राबविण्यात आली.
या पध्दतीने जनजागृती उपक्रम आणि दंडात्मक कारवाईच्या माध्यमातून गावातील एकल प्लास्टीक हटविण्याची मोहीम यशस्वी होत आहे. 15 ऑगस्ट 2025 पूर्वी उर्वरित तालुक्यातील पाच गावे प्लास्टीकमुक्त करण्याची कार्यवाही पाणी व स्वच्छता विभाग जिल्हा परिषद कोल्हापूर यांच्या मार्फत सुरु आहे, अशी माहिती जल जीवन मिशनच्या प्रकल्प संचालक माधुरी परीट यांनी दिली आहे.