समर्थ सेवेकऱ्यांच्या भागवत पारायणामुळे राष्ट्रासह सकल समाजाचे हित- गुरुमाऊली आण्णासाहेब मोरे

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

श्रीक्षेत्र गोवर्धन येथे भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहाची श्रद्धापूर्वक सांगता..

मथुरा/नाशिक (सुनिल साळवी): भगवान श्रीकृष्णाची पवित्र नगरी श्री क्षेत्र गोवर्धन येथे समर्थ सेवेकर्‍यांनी सात दिवस अत्यंत श्रद्धेने व मनोभावे केलेल्या भागवत पारायणाच्या अतिउच्च सेवेमुळे देशावरील अरिष्टे निश्चितच टळतील आणि भारतीय संस्कृतीचे संरक्षण होऊन सकल समाजाचे हित साधले जाईल यात तीळमात्र शंका नाही असा विश्वास परमपूज्य गुरुमाऊली श्री. आण्णासाहेब मोरे यांनी व्यक्त केला तेव्हा उपस्थित हजारो सेवेकर्‍यांनी टाळ्यांचा प्रचंड कडकडाट करून आनंद साजरा केला.

श्री क्षेत्र गोवर्धन येथे सेवामार्गातर्फे घेण्यात आलेल्या भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहाची सांगता ४जुलै रोजी अत्यंत भावपूर्ण वातावरणात राधे- राधेच्या जयघोषात झाली.या सांगता सोहळ्याला परमपूज्य गुरुमाऊली व कार्ष्णि गुरु श्री शरणानंद बाबा महाराज यांची विशेष उपस्थिती होती.यावेळी गुरुमाऊलींनी सेवेकर्‍यांना संबोधित केले.

ते म्हणाले की, भगवान श्रीकृष्णाने समस्त सेवेकऱ्यांकडून भागवत पारायणाची सेवा करून घेतली आहे. राष्ट्राचे संरक्षण व्हावे, समाजाचे कल्याण व्हावे, संस्कृती वृद्धिंगत व्हावी या उदात्त हेतूने सेवामार्गाने गोवर्धन पर्वताच्या पायथ्याशी भागवत सप्ताहाचे आयोजन केले होते. आपण ही सर्वोच्च सेवा केली म्हणून सेवेकऱ्यांनी अहंकार बाळगू नये कारण ही सेवा साक्षात परमेश्वराने तुमच्याकडून करून घेतली आहे हे लक्षात घ्यावे व या सेवेतून प्राप्त ऊर्जा सकारात्मक कामासाठी, समाजाच्या हितासाठी वापरावी असे गुरुमाऊलींनी सूचित केले. विश्वाचा संहार रोखण्याचा मार्ग भागवतासारख्या दिव्य ग्रंथात आहे.त्यामुळे भागवत सेवेने निश्चितच विश्वशांती नांदेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

गुरुमाऊली हे भगवंताचा आविष्कार – शरणानंद बाबा

कार्ष्णि गुरू श्री शरणानंद बाबा यांनी शुभेच्छा देताना परमपूज्य गुरुमाऊली, सेवामार्ग आणि भागवत पारायण करणाऱ्या समस्त सेवेकऱ्यांवर स्तुतीसुमनांचा अक्षरशः वर्षाव केला. परमपूज्य गुरुमाऊली हे साक्षात भगवंताचा आविष्कार असून भगवान श्रीकृष्णाचे कार्य ते पुढे समर्थपणे चालवीत आहेत. समर्थ सेवेकर्‍यांनीही सात दिवस अत्यंत मनोभावे सेवा करून शिस्तीचे दर्शन घडविले. याबद्दल सर्वांचेच कौतुक करावे तेवढे थोडे आहे असे गौरवोद्गार श्री शरणानंदबाबा यांनी काढले तेव्हा सेवेकर्‍यांनी पुन्हा टाळ्यांचा जोरदार कडकडाट केला.

दोन महान संतांचा अविस्मरणीय गौरव सोहळा..

कार्ष्णि गुरू श्री शरणानंद महाराजांनी कार्ष्णि आश्रमाच्या वतीने परमपूज्य गुरुमाऊलींच्या गळ्यात सुवर्णसाखळी आणि मस्तकावर चांदीचा मुकुट असलेला फेटा घालून आणि भेटवस्तू देऊन यथोचित सन्मान केला आणि त्याचबरोबर चांदीच्या नाण्यांनी गुरुमाऊलींची दृष्ट देखील काढली. स्वामी सेवामार्गातर्फे परमपूज्य गुरुमाऊलींनीही सुवर्ण आभूषण आणि भेटवस्तू देऊन श्री शरणानंद बाबा यांचा गौरव केला . या दोन महान संतांचा हा गौरव सोहळा पाहून समस्त सेवेकरी अक्षरशः भावविभोर झाले. सभागृह जल्लोष, आनंद, उत्साह आणि जयजयकारामुळे काही काळ दणाणून गेले.

सप्ताहाची सांगता.. आयोजकांचे आभार

परमपूज्य गुरुमाऊली श्री. आण्णासाहेब मोरे यांच्या आशीर्वादाने गुरुपुत्र श्री.नितीनभाऊ मोरे व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचे अत्यंत नीटनेटके आणि नियोजनबद्धपणे आयोजन केले होते. संपूर्ण वातानुकूलित सभागृह, सात्विक भोजन आणि निवासाची व्यवस्था या सर्व सुविधांमुळे दहा हजार सेवेकर्‍यांना सात दिवस मनोभावे सेवा रुजू करता आली. या नियोजनाबद्दल गुरुपुत्र श्री नितीनभाऊ मोरे आणि भागवताचे रसाळ निरूपण करणारे मुख्य याज्ञिकी श्री दीपकशास्त्री मुळे व आयोजकांचे समर्थ सेवेकर्‍यांनी आभार मानले. सात दिवस गोवर्धनाच्या पायथ्याशी सर्वोच्च सेवा करता आली याचे समाधान मानतानाच जड अंतःकरणाने सेवेकरी माघारी परतू लागले. सप्ताहाला दहा हजार सेवेकरी तर सांगतेच्या विशेष सेवेला एकूण सुमारे पंधरा हजार सेवेकऱ्यांची उपस्थिती लाभली. सांगतेच्या दिवशी महाविष्णू याग, श्री सत्यनारायण आणि चक्रराज श्रीयंत्र पूजनाची सेवा घेण्यात आली.

संपूर्ण सेवा श्रीकृष्ण चरणी समर्पित..

दहा हजार सेवेकऱ्यांचे सामुदायिक भागवत पारायण.. समाजासाठी करण्यात आलेल्या विशेष सेवा.. वेगवेगळ्या मंत्रांचे पुरुश्चरण या संपूर्ण सेवा सांगतेच्या दिवशी परमपूज्य गुरुमाऊलींनी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी समर्पित केल्या तेव्हा उपस्थित सेवेकर्‍यांनी स्वामीनामाचा जयजयकार केला आणि निर्विघ्नपणे सेवा पार पडल्याबद्दल भगवंताविषयी कृतज्ञता व्यक्त केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मुकुंदराव कुलकर्णी यांनी नेटक्या शब्दात केले.

गोवर्धन नगरीत निघाली भव्य शोभायात्रा…

परमपूज्य गुरुमाऊली श्री आण्णासाहेब मोरे यांचे गोवर्धन नगरीत आगमन झाल्यानंतर उत्साही सेवेकर्‍यांनी एका सुशोभित रथामधून परमपूज्य गुरुमाऊली श्री. मोरे व गुरुमाता सौ मंदाकिनीताई मोरे यांची वाजत- गाजत स्वामीनामाच्या जयघोषात कार्ष्णि आश्रमापर्यंत अत्यंत उत्साही वातावरणात शोभायात्रा काढली. शोभायात्रेत पारंपरिक वेशभूषेत सहभागी होऊन सेवेकर्‍यांनी भारतीय संस्कृतीचे दर्शन घडवले. संपूर्ण सप्ताहाच्या कार्यक्रमाला गोवर्धन येथील कार्ष्णि आश्रमाचे तसेच स्थानिक प्रशासनाचे उत्तम सहकार्य लाभले.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.