*चला, उठा… सज्ज व्हा!…बुडण्यासाठी!!
मकरंद भागवत, पत्रकार, चिपळूण.
मो. 9850863262
TWJ चे गुंतवणूकदार हवालदिल झालेत. हजारो लोकांचे हजारो कोटी अडकलेत. लोकं फेऱ्या मारतायत, कंपनीचे संचालक अज्ञात ठिकाणी बसून व्हिडिओद्वारे आश्वासनाची गाजरं दाखवत आहेत. ‘तारीख पे तारीख’ चालू आहे. तिप्पट काय, पाचपट काय, दहापट काय… वाट्टेल ते आमिष दाखवून सहज फसवता येतं हे आता ओपन सिक्रेट आहे. पैशाचा हव्यास, लोभीपणा जोपर्यंत संपत नाही आणि असे महामूर्ख लोकं जोपर्यंत आहेत तोपर्यंत अशा फसवणुकीच्या घटना घडत राहणारच. एक फसवतो आणि जातोय न जातोय तोच दुसरा येतो…तसाच तिसरा येतो. हे चक्र अखंड चालू राहणार आहे. काही होऊद्या यात कणभरही फरक पडणार नाही. अजून आठ पंधरा दिवस TWJ ची चर्चा होईल. तोपर्यंत नवीन कंपनी चर्चेत येईल. बाकी राज्याचे जाऊद्या, केवळ रत्नागिरी जिल्ह्याचा विचार करा… गेल्या पंचवीस – तीस वर्षांचा काळ आठवा आणि बघा… किती बोगस कंपन्या आल्या… आपल्या लोकांना किती कोटी किंवा अब्जचा चुना लावला गेला, पण नाही… आपल्या डोळ्यांवर हव्यास आणि मूर्खता अशा दोन पट्ट्या करकचून बांधलेल्या आहेत. त्या सोडायच्या नाहीत असा आपण पणच केला आहे. त्यामुळे सतत बुडत राहणे, बुडलं की छाती बडवत राहणे आणि थोड्या दिवसांनी पुन्हा चौपट, पाचपट देणारा कोणी आला की अक्कल गहाण टाकणं हाच आपला ‘ सोनेरी ‘ भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ आहे.
त्यामुळे बुडणाऱ्यांबद्दल आता फार सहानुभूती वाटेनाशी झाली आहे. गरीब असो वा श्रीमंत.. सर्वांना सर्व कळतं.. एवढी सुधारणा आपल्याकडे नक्कीच झाली आहे. उलट नको त्या बाबतीत तर जास्तच कळतं आणि हव्या त्या बाबतीत आम्ही कळूनच घ्यायचं नाही असा दृढनिश्चय केला आहे. आणखी थोडे दिवस थांबा अशी बुडव्यांची आणि बुडणाऱ्यांची नवी स्टोरी वृत्तपत्र, टीव्ही, सोशल मीडियावर येउही शकते… कदाचित हा लेख लिहिपर्यंतही असा एखादा घोटाळा उघड होऊ शकतो…
या सर्व बुडाणाऱ्या मंडळींमध्ये दोन नंबरवाले आहेत, मोठमोठे व्यावसायिक आहेत, सरकारी अधिकारी, कर्मचारी आहेत पण विशेष म्हणजे कायद्याचे रक्षक पोलीस आणि ज्यांनी विद्यार्थी, नवी पिढी सुजाण बनवायची ती शिक्षक मंडळी या भानगडीत जास्त दिसून येत आहेत. आज कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याला, कर्मचाऱ्याला पन्नास हजारापासून पुढे दीड दोन लाखात तरी पगार नक्कीच मिळतो. सरकार शिक्षकांनाही अतिशय चांगले पगार देते. पण तरीही त्यांची पैशाची हाव सुटत नाही. असंख्य शिक्षक शाळा सोडून बाकीच्या धंद्यात इंटरेस्ट जास्त घेतात. ‘कामगिरी ‘ वरचा शिक्षक किंवा शिक्षक पुढारी हे कोडं खुद्द ब्रह्मदेवही सोडवू शकत नाही. जे शिक्षक पेशाशी प्रामाणिक आहेत त्यांच्याबद्दल आदर कायमच आहे, पण बाकीच्यांना असले उद्योग करताना थोडीशीही लाज वाटत नाही का? आता पोलीस.. ज्यांनी लोकांना जागृत करायचं, फसवणाऱ्यावर कारवाई करायची तेच TWJ चे
‘ भाग्यविधाते ‘ ठरले. आता स्वतः मात्र तोंड लपवत आहेत. कोणत्या तोंडाने लोकांना सांगावे की आम्ही पण बुडालोय. ‘ सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही ‘ अशी अवस्था पोलिसांची झाली आहे.
असो.. आपण नेहमीप्रमाणे जनजागृतीचं काम करायचं, त्यासाठी चार शिव्या खायच्या. बाकीच्यांनी आता नवीन स्कीमच्या शोधात बाहेर पडायला हरकत नाही.
ता. क. अशा घोटाळ्यांमध्ये जे कापल्या करंगळीवर मुतणार नाहीत, एखाद्या गरीबाचा, अडलेल्याचा आधार बनणार नाहीत, समाजासाठी उपयोगी पडणार नाहीत असे ‘श्रीमंत पण कवडीचुंबक, चामट’ लोकं बुडाले तर आनंदच वाटतो. ते असेच बुडायला पाहिजेत.