निर्जनस्थळी वृद्धांना मारहाण…LCB चा धडाका, टाेळी जेरबंद… मुद्देमाल जप्त

पाँझिटीव्ह वाँचचे सभासद व्हा. शासन मित्र, पाेलीस मित्र, पत्रकार मित्र बना.

निर्जनस्थळी वृद्धांना मारहाण करुन जबरी चोरी करणारी टोळी जेरबंद

कोल्हापूर – जिल्ह्यातील चंदगड व गडहिंग्लज परिसरात वृद्धांना निर्जनस्थळी मारहाण करून जबरी चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने जेरबंद केली. आरोपींकडून सोन्याचे दागिने, दोन मोबाईल फोन व गुन्ह्यात वापरलेली स्प्लेंडर दुचाकी असा एकूण २,४०,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील वाढत्या दरोडे व जबरी चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिस अधीक्षक  याेगेश गुप्ता यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला समांतर तपासाचे आदेश दिले होते. या अनुषंगाने पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली वेगवेगळी पथके तयार करण्यात आली. पोलीस अंमलदार प्रविण पाटील, दिपक घोरपडे व समीर कांबळे यांनी चंदगड व गडहिंग्लज परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तसेच गोपनीय माहिती घेतली.

गोपनीय माहितीवरून हरळी बुद्रुक येथील दोन संशयित आरोपी २ जुलै रोजी गडहिंग्लज येथील नलवडे साखर कारखान्याजवळ स्प्लेंडर दुचाकीवर येणार असल्याचे समजल्यावर पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यांची नावे देवेंद्र दिंगबर पताडे (वय १९, रा. हरळी बुद्रुक) आणि बाळू परशराम नाईक (वय २८, रा. जरळी) अशी आहेत. त्यांच्याकडून ओपो आणि व्हीओ कंपनीचे दोन मोबाईल जप्त करण्यात आले.

सखोल चौकशीत त्यांनी चंदगड येथे एका वृद्ध महिलेच्या घरात घुसून तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याचा प्रयत्न केल्याची कबुली दिली. या घटनेत हस्तक्षेप करणाऱ्या वृद्ध पुरुष व एका लहान मुलास मारहाण करण्यात आली होती. तसेच सहा महिनेपूर्वी गडहिंग्लजमध्ये एका वृद्ध महिलेला चाकूने मारहाण करून तिच्याकडील बोरमाळ आणि मंगळसूत्र लुटल्याची कबुलीही त्यांनी दिली. या गुन्ह्यातील १४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. या सर्व घटनेची नाेंद चंदगड पाेलीस ठाणे व गडहिंग्लज पोलीस ठाण्यात  करण्यात आले आहेत. आरोपींना मुद्देमालासह  पोलीस ठाण्यात हजर करून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक योगेश गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर, पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे, तसेच पोलीस अंमलदार प्रविण पाटील, दीपक घोरपडे, समीर कांबळे, सतीश जंगम, अरविंद पाटील, अमित सर्जे, सतीश सूर्यवंशी, राजेंद्र वरडेंकर यांच्या पथकाने केली.

पाँझिटीव्ह वाँच युथ असाेशिएन: पाेलीस मित्र, शासन मित्र, पत्रकार मित्र व समाज मित्र चे सभासद व्हा. बारमाही सवलत..आमच्या लाेकप्रिय पाँझिटीव्ह वाँच न्यूज पाेर्टलवर अल्पदरात छाेटी व माेठी जाहिरात द्या.