‘हेक्टरी १२५ मे.टन ऊस उत्पादकता वाढ’ अभियानाचा शुभारंभ
कोल्हापूर (विनायक जितकर) – मुख्यमंत्री प्रशासकीय गतिमानता अभियानांतर्गत ‘हेक्टरी १२५ मे.टन ऊस उत्पादकता वाढ’ प्रकल्पाचा शुभारंभ आज कृषी दिनानिमित्त कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन सभागृहात झाला. या कार्यक्रमात स्व. वसंतराव नाईक आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमांना अभिवादन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री तथा सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थितांना संबोधित केले.
पालकमंत्री आबिटकर म्हणाले, शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांना उत्पादनवाढीसाठी मार्गदर्शन आणि प्रशिक्षण द्या. शासकीय योजनांची माहिती गावागावांत आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जनजागृती करा. बियाणे, खते, पाणी व्यवस्थापन आणि जमीन व्यवस्थापनाबाबत योग्य वेळी शेतकऱ्यांना सहाय्य मिळेल याची खात्री करा. त्यांनी या अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी कसोशीने नियोजन करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आणि शेतकऱ्यांनीही या संकल्पाला गती देण्यासाठी सहभागी होण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अमोल येडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, विभागीय कृषी सहसंचालक बसवराज मास्तोळी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे, विशेष कार्य अधिकारी शरद मगर, आत्मा प्रकल्प संचालक रक्षा शिंदे, कृषी विकास अधिकारी सारिका वसगावकर आदी उपस्थित होते. तसेच सर्व तालुक्यांमधून हजारो शेतकरी ऑनलाइन पद्धतीने सहभागी झाले. कृषी विभाग, आत्मा, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती करवीर यांच्या संयुक्त विद्यमाने स्व. वसंतराव नाईक जयंती आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी राजर्षी शाहू महाराजांच्या शेतीविषयक दूरदृष्टीचा आदर्श घेऊन सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन केले. कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वापर, गावनिहाय उत्पादन नोंद, शेतकरी मेरीट लिस्ट तयार करणे आणि अन्न प्रक्रिया उद्योगात शेतकऱ्यांचा सहभाग वाढवणे यावर भर द्या, असे त्यांनी सांगितले.
तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि शेतकरी सन्मान
ऊस विशेषतज्ज्ञ शांतीकुमार पाटील यांनी ऊस उत्पादन आणि माती परीक्षणाबाबत, चंद्रकांत पाटील यांनी शाहू महाराजांच्या कृषी कार्याबाबत, तर कृषी उपसंचालक नामदेव परीट यांनी अभियानाच्या उद्दिष्टांवर सादरीकरण केले. सुदर्शन वाळवेकर यांनी कीटकनाशक फवारणीची काळजी, तर विजय बुनगे यांनी नॅनो खतांचे महत्त्व विशद केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सारिका वसगावकर यांनी केले, तर आभारप्रदर्शन तालुका कृषी अधिकारी युवराज पाटील यांनी केले.
यावेळी राज्य, जिल्हा आणि तालुका स्तरावरील पीक स्पर्धा विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. प्रधानमंत्री अन्न प्रक्रिया योजना आणि कृषी विभागाचे लाभार्थी, तसेच तालुका सल्लागार समिती व आत्मा सदस्यांना निवडपत्र प्रदान करण्यात आली. जमीन आरोग्य पत्रिकांचे वितरण आणि स्व. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह योजनेंतर्गत वारसदारांना अर्थसहाय्य वाटप करण्यात आले. अभियानाच्या शुभारंभ प्रसंगी पोस्टर, चित्रफीत आणि भित्तीपत्रकांचे अनावरणही करण्यात आले.