पन्हाळा येथे अतिक्रमण कारवाईवरून आरपीआय (आठवले) पक्षाकडून तहसीलदारांना निवेदन
शिरोली (रुपेश आठवले): काखे (ता. पन्हाळा) येथील गट क्रमांक 261/अ मधील गायरान जागेवरील अतिक्रमण हटवण्याच्या प्रक्रियेत पक्षपातीपणा व जातीय दुर्बोधन झाल्याचा आरोप करत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले)च्या वतीने पन्हाळा तहसीलदारांना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, सदर गायरान जागेत गावातील काही रहिवाशांचे पुनर्वसन झाले असून अनेक कुटुंबांनी या जागेवर अतिक्रमण करून वास्तव्य सुरू केले आहे. विशेषतः दादासो मारुती सुरवसे यांचे अतिक्रमण असल्याचे नमूद केले गेले आहे. पंचायत समिती, पन्हाळा येथील गटविकास अधिकारी यांनी 31 मे 2025 पर्यंत अतिक्रमण हटवण्याचे आदेश दिले होते.
**मात्र, दिनांक 19 मे 2025 रोजी कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस न देता केवळ सूर्यवंशी कुटुंबाचे अतिक्रमण हटवण्यात आले, असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. त्याच दिवशी पंचायत समिती पन्हाळा येथे समाजातील काही घटकांकडून आंदोलन सुरु असताना ही कारवाई करण्यात आल्याचेही नमूद करण्यात आले असल्याचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी सांगितले.
त्याचबरोबर गट क्र. 203/अ मधील बौद्ध व ख्रिश्चन समाजाच्या दफनभूमीवर कुंभार समाजाच्या वीटभट्टीचे अतिक्रमण असून, 23 जानेवारी 2023 रोजी त्या अतिक्रमणावर कारवाईचे आदेश असतानाही अद्याप कार्यवाही न झाल्याचे दाखल करण्यात आले आहे.
या पार्श्वभूमीवर निवेदनकर्त्यांनी सूर्यवंशी कुटुंबाच्या अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईची चौकशी करून ग्रामविकास अधिकाऱ्यांवर संबंधित कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्याची मागणी केली आहे. तसेच कारवाई न झाल्यास तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा देखील देण्यात आला आहे. निवेदनातं काय आहे वाचा सविस्तर.
या निवेदनावर अमर उर्फ प्रकाश कदम (तालुका अध्यक्ष), सरदार तिवडे, धनाजी सूर्यवंशी, अविनाश दाभाडे, दीपक सूर्यवंशी, ऋतुराज कदम, अंथोनी कदम, प्रदीप पाटील, दादासो सूर्यवंशी व इतर पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.















































