चिल्लर पार्टी विध्यार्थी चित्रपट चळवळीच्या कऱ्हाड शाखेचे उद्घाटन…
कोल्हापूर – मुलांनी कोणते चित्रपट पहावेत, कसे पहावेत हे तर चिल्लर पार्टी शिकवतेच, पण मुलांना पालकांनी काय दाखवावे, हेही पालकांना शिकवते, असे उदगार कऱ्हाड अर्बन कुटुंब प्रमुख सुभाषराव जोशी यांनी काढले. चिल्लर पार्टी विध्यार्थी चित्रपट चळवळीच्या कऱ्हाड शाखेचे रविवारी उद्घाटन झाले. या प्रसंगी ते बोलत होते.
ते पुढे म्हणाले, कोल्हापुरात सुरु झालेली ही चळवळ कऱ्हाडमध्ये चांगल्या पद्धतीने रुजवली जाईल. प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या रविवारी कऱ्हाडमधील मुलांसाठी जगातील उत्तोमोत्तम बाल चित्रपट दाखवले जातील. त्याचबरोबर मुलांना एक वही व पेन दिले जाईल. पाहिलेल्या सिनेमावर मुलांनी आपल्याला सिनेमा कसा वाटला याबद्दल लिहावे. वर्षभर लिहिलेल्या या वह्यांमधून प्रथम पाच क्रमांकांना बँकेच्या वतीने बक्षीस दिले जाईल, असेही त्यांनी जाहीर केले.
यावेळी चिल्लर पार्टीचे संस्थापक मिलिंद यादव म्हणाले, “यशवंतराव चव्हाण यांच्या कर्मभूमीत चिल्लर पार्टीचे काम सुरु होते आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे. मुलांनी सिनेमे पाहिले पाहिजेत फक्त त्यातील चांगले काय आणि वाईट काय ? हे समजून घेऊन वागले पाहिजे.” सुरूवातीला बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे मान्यवरांनी पूजन केले.
यावेळी चिल्लर पार्टी, कोल्हापूरच्या वतीने ‘शिनेमा पोरांचा’ हे पुस्तक सर्व मान्यवरांना भेट देण्यात आले. कार्यक्रमासाठी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गुरव, समीर जोशी, चिल्लर पार्टीच्या शिवप्रभा लाड, निसर्ग मित्रचे डॉ. अमोल पाटील, ए. आर. पवार, जालिंदर काशिद, शैलेश चव्हाण, ओंकार कांबळे उपस्थित होते. तानाजी बुरुंगले यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. सुधीर कुंभार यांनी आभार मानले.