हेरवाडे कुटुंबीयांना दिला मदतीचा हात…
राधानगरी – घोटवडे तालुका राधानगरी येथे कर्नाटक राज्यातील कुर्ली ता. चिक्कोडी येथील धनगर समाजातील सिद्धू हेरवाडे व बेरू हेरवाडे यांच्या बकऱ्यांच्या ४५० कळपातील जवळपास ७५ बकऱ्यांना विषबाधा झाली. सायंकाळी सात नंतर डोंगर, शेत रानातून दिवसभर चरून सदरचे मेंढपाळ घोटवडे गावातील माळवाडी शेतीमध्ये तळावरती बकरी घेवून जाताना अचानक काही बकऱ्यांचे पोट गच्च होऊन अंग ताठ होऊन वाटेत पडू लागली हि परिस्थिती पाहून धनगर हेरवाडे घाबरून रडू लागले त्यावेळी गावातील लोक जमू लागले.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अभिषेक डोंगळे यांनी सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांना सांगून गोकुळचे पशुवैद्यकीय अधिकारी, जि. प. चे अधिकारी तसेच स्थानिक कृत्रिम रेतनसेवक यांची तात्काळ मदत मागवून घेऊन बाधित बकऱ्यांना आवश्यक तो औषधोपचार केल्याने पुढील मोठी दुर्घटना टळली. बाधित ७५ पैकी १४ बकरी विषबाधेने मयत झाली. बाधित बकऱ्यांच्या औषध उपचारावरील सर्व खर्च अभिषेक डोंगळे यांनी स्व:खर्चातून करून हेरवाडे कुटुंबीयांना आधार देण्याचे काम केले.
यावेळी बाधित बकऱ्यांच्या वरती जिल्हा परिषद पशुवैद्यकिय अधिकारी गोविंद कटरे, गोकुळ पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. बारवे, डॉ. एस. के. पाटील यांनी उपचार केले तत्पूर्वी स्थानिक कृत्रिम रेतनसेवक संजय डोंगळे, विक्रम कुलकर्णी, पवन गुरव यांनी प्राथमिक औषधोपचार केले. यावेळी उपस्थित सरपंच धिरज डोंगळे, संजय डोंगळे, युवाशक्ती अध्यक्ष सुहास डोंगळे, अनिकेत डोंगळे, संग्राम डोंगळे व सर्व पदाधिकारी व तरूण युवक,ग्रामस्थ उपस्थितीत होते.
















































