सोबतचा संदेश वाचला आणि कळ मनात उठली म्हणून प्रतिक्रिया
जे काही आप्पलपोट्टे,पत्रकार म्हणवून घेतात, बातमीदारीच्या नावाखाली बिभत्स, विकृत दुकानं, काळी बातमीदारी करतात त्यांना श्रध्दांजलि जनता देईल – शीतल हरीष करदेकर
मी मालिका, चित्रपट, कोळीष्टक मालिका फार काही पाहत नाही. ३० ऑगस्टला आई पाहत असलेल्या मालिकेत शंतनू मोघेची एंट्री झाली. मी तरी त्याला शहाजी महाराजच म्हणते. लेकीला आणायला जाताना टीव्हीवर नेमका त्याच्याच एंट्रीचा भाग दिसला आणि आम्हाला दोघींना प्रियाची आठवण आली. “हल्ली प्रिया मराठे दिसत नाही कुठे” आईने म्हटलं ही.
साधारण ५.६”/५.७” उंची असावी. शिडशिडीत बांधा, गौरवर्ण टोकदार नाक आणि आवाजात वेगळीच खर आणि जबराट वेरिएशन, स्पष्ट शब्द उच्चार. झोपेतही आवाज कानावर पडला तरी मी नक्की सांगू शकले असते की हा आवाज कोणाचा आहे ते. इतकी ही अभिनेत्री अगदी मनाच्या आत उतरलेली. कमी वयात गेली. दोन वर्षे मृत्यूला झुलवत ठेवणं इतकं सोपं नव्हतंच. मृत्युची गणितं वेगळीच असतात. अभ्यासक्रमाबाहेरची. हळहळण्याशिवाय हाती काहीच उरत नाही.
त्या दिवशी सकाळी मी ‘श्रध्दांजलीच्या बनावट बातम्या देणाऱ्यांवर’ पोस्ट टाकली आणि अर्ध्या तासात प्रियाची बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली. काही मोजकीच वर्तमानपत्रे आहेत, जी अजून ५०% तरी विश्वास ठेवण्याच्या लायकीची आहेत.
पुन्हा गुगलवर पाहिलं. सगळ्यांनीच बातमी लावली होती. खात्री पटली, ती गेलीय. नात्याची ना गोत्याची पण आतून तुटलं काहीतरी; वाईटही वाटलं. डोळ्यात पाणी आलं. त्यानंतर दिवसभर #priyamarathe हॅशटॅग असलेल्या बऱ्याच बातम्या, पोस्ट्स फेसबुक आणि गुगलने दाखवल्या. कोणत्याही कमेटमध्ये ‘भावपूर्ण श्रध्दांजली’ लिहावंसं वाटलं नाही. त्या सगळ्या पोस्ट वाचल्यावर लक्षात आलं की आपल्याला ती का आवडत होती. कारण खलनायकी भूमिका करणारी ती खरंच मनस्वी आणि गोड होती. तिच्यासाठी हळहळणाऱ्यांची संख्या जास्त होती. ‘मरावे परी सुकिर्तीरुपे उरावे’ या उक्तीत तंतोतंत बसली.
ती गेल्याचं दुःख एकीकडे होतंच तरीही प्रचंड राग आला तो कमेंट सेक्शनमध्ये बरळणाऱ्यांचा. काय बोलावं लोकांना? तीन महिन्याच्या ४५९ रुपयांचा टॉक टाईम फ्रीवाला डाटा पॅक रिचार्ज केला की सगळ्यातलं सगळं माहिती असण्याची शक्ती मिळते असं रिचार्जधारकाला वाटतं. काय कमेंट करता फोसडीच्यांनों? तुम्हाला काय माहिती असते?
“ह्या लोकांना बाहेरचं खायची सवय असते त्यानेच कॅन्सर होतो”, “अति मेकअप केला की कॅन्सर होतोच”अशाप्रकारच्या बऱ्याच कमेंट्स होत्या. सर्दी खोकल्याबद्दल माहिती नसणारे कॅंन्सरचं आभाळ हेपलतात तेव्हा कीव येते लोकांची.
त्यात महाकहर केला तो पत्रकारांनी, “प्रिया मराठेच्या ऑनस्क्रीन नवऱ्याला अश्रू अनावर”
अरे भिक्कारगोट्यांनों, तो अभिजित खांडकेकर आहे. त्याचा उल्लेख त्याच्या नावाने करा किंवा सहकलाकार म्हणा, निदान एखादी सज्जन व्यक्ती कमी वयात गेलेली असते तेव्हा तरी. निदान तेव्हा तरी असे बिनडोक थंबनेल बनवू नका. कोडगे तर असताच तुम्ही, निदान लोक प्रक्षोभाला तरी घाबरा. फेसबुक, गुगलकडून जाहिरातींचा डॉलरमध्ये मिळणाऱ्या पैशांचा मोह आवरा. इतक्या खालच्या थराला जाऊ नका. एखाद दिवशी तुमचा गर्णव ओस्वामी किंवा विखिल नागळे होण्यास वेळ लागणार नाही. इतका खालचा तळ गाठू नका की तुम्हाला सुधारण्यासाठी सामान्य माणसाला त्याचं शांत राहणं बाजूला ठेवावं लागेल. एकजुटीने तुमच्या वेबसाईटला रिपोर्ट करावा लागेल अशी वेळ आणू नका. सुधरा.
वरची ‘अश्रू अनावर’ची बातमी आणि ‘प्रिया मराठे एवढी संपत्ती मागे ठेवून गेली’ ही बातमी करणाऱ्या पत्रकारांना भावपूर्ण श्रद्धांजली. आता तुम्ही कधीही मरायला मोकळे
©️ Velvet Kavisha ✍️
|