पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या माध्यमातून तातडीने पाच मेगावॅटच्या ठिकाणी दहा मेगावॅट ट्रांस्फार्मर मंजूर
धामोड (विनायक जितकर) – येथील विद्युत उपकेंद्रासाठी 10 मेगावॅटचे रोहित्र पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी मंजूर केल्याने या परिसरातील सुमारे 25 वर गावातील शेतकऱ्यांचा प्रश्न निकालात निघणार आहे. या अखत्यारीत येणाऱ्या सर्व गावात आता दिवसा शेतीसाठी विज मिळणार आहे.
या उपकेंद्रामध्ये पाच मेगावॅट क्षमतेचे रोहित्र (ट्रांस्फार्मर ) असल्याने धामोड, केळोशी, म्हासुर्ली परिसरातील अनेक शेती पंपांना दिवसा वीज देणे शक्य होत नव्हते. यामुळे शेतकऱ्यांना रात्रभर शेतीच्या पाण्यासाठी जाताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. आधीच हा जंगलव्याप्त परिसर असल्याने जंगली श्वापद आणि सापांची भीती. अशा परिस्थितीत रात्री पाणी घेणे म्हणजे जीवावर बेतण्यासारखे असते. यामुळे येथील शेतकऱ्यांनी नुकतेच आंदोलन करून दिवसा शेतीसाठी वीज पुरवठा करावा अशी मागणी केली होती.
याची दखल घेत पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी तातडीने पाच मेगावॅटच्या ठिकाणी दहा मेगावॅट ट्रांस्फार्मर मंजूर केला आहे. याचा फायदा धामोड, केळोशी व म्हासुर्ली परिसरातील शेकडो शेतकऱ्यांना होणार आहे. या कामी वीज वितरण कंपनीचे मुख्य अभियंता स्वप्नील काटकर, अधीक्षक अभियंता गणपत लटपटे, कार्यकारी अभियंता दत्तात्रय भणगे, उपकार्यकारी अभियंता ओंकार डांगे व विलास डवर यांचे सहकार्य लाभले आहे.

















































