चाळीस वर्षांपूर्वी 1984 साली प्रवीणनं पहिल्यांदा सांगलीतील शांतिनिकेतनच्या एका कार्यक्रमांमध्ये चार्ली चॅपलीनचा दहा मिनिटांचा परफॉर्मन्स सादर केला होता. त्यावेळी सगळेजण त्याला डोक्यावर घेऊन नाचले होते. त्यानंतर इंटरनॅशनल युथ फेस्टिवल मध्ये सुद्धा त्याला चार्लीच्या माईम बद्दल पुरस्कार मिळाला होता. आणि नंतर अनेक ठिकाणी त्याचे कार्यक्रम बिदागी देऊन होऊ लागले.आणि त्याला चार्लीच्या रूपाने उपजीविकेचे जणू साधनच मिळालं. तो मुंबईत स्थायिक झाला. तिथे त्यांनं चार्ली चॅपलीनचे एकपात्री प्रयोग करत करत ‘वंडरफुल इव्हिनिंग्ज’ नावाची इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी सुरू केली. आजपर्यंत दुबई, मॉरिशस, अबुधाबी पासून भारतातल्या महत्त्वाच्या शहरातील फाईव्ह स्टार हॉटेल्स पासून ते अगदी धारावीच्या झोपडपट्टीतली माणस आणि वेश्यावस्तीतल्या लहान मुलांसाठीदेखील त्यांनं अनेक प्रयोग सादर करून माणसांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवलं आहे. त्याने सांगितलं की 16 एप्रिल या चार्ली चॅपलीनच्या वाढदिवशी चार्लीची हुबेहूब नक्कल करणारे महाराष्ट्रातले दहा कलाकार एकत्र येतात आणि चार्ली चॅपलीनचा वाढदिवस साजरा करतात.
प्रकारे डुप्लिकेट आर्टिस्टच्या मुंबईत राष्ट्रीय पातळीवरच्या दोन-तीन संघटना असल्याचंही प्रवीणनं बोलता बोलता सांगितले. ‘मल्टी टॅलेंटेड आर्टिस्ट फाउंडेशन’, ‘युनायटेड लूक लाईक आर्टिस्ट फाउंडेशन’ नावाच्या! या संघटनमध्ये चार-पाच अमिताभ बच्चन, पाच सलमान खान, चार शाहरुख खान, चार गोविंदा, दोन-तीन शक्ती कपूर,अनिल कपूर, अमजद खान, दिलीप कुमार, ऋत्विक रोशन, जॉनी लिव्हर इतकच काय नरेंद्र मोदी, अण्णा हजारे, रामदेव बाबा, अरविंद केजरीवाल अशा अनेक अभिनेते आणि नेते मंडळीं सारखे हुबेहूब दिसणारे डुप्लिकेट कलाकार सभासद म्हणून एकत्र आलेले आहेत. त्यांची दरवर्षी गॅदरिंग होतात. पारितोषिक वितरण समारंभ होतात. या क्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या लोकांचे सत्कार केले जातात. कोरोनाच्या काळात तर या संघटनांनी कामे मिळण्याचे बंद झाल्याने या कलाकारांना जगवण्यासाठी जीवाचं रान केलं.
जगामध्ये एक सारख्या चेहऱ्याची किमान सात माणसे असतात असे गृहीतक मांडलं जातं. आता हे कुणी सांगितलं ठाऊक नाही, पण या गृहीतकामधे काहीतरी तथ्य असावं. असं वातावरण प्रवीणच्या गप्पातून साकारत गेलं. आपल्या सांगलीतही सियाराम टेलर्स नावाची फर्म चालवणारे आमचे मित्र बसवराज पाटील हुबेहूब रजनीकांतसारखे दिसतात. अनेक जण त्यांच्याबरोबर फोटो देखील काढून घेत असतात. तर मग या व्यावसायिक दृष्ट्या डुप्लिकेट किंवा हमशकल दिसणाऱ्या कलाकारांना भरपूर मागणी असणारंच हे निर्विवाद.!