ती संध्याकाळ आणि रात्र रोमांचक होती. ‘सार्थक निवास’च्या अविनाश ठाकूर आणि सौ. श्रध्दा ठाकूर यांनी बीचवरच्या वाळूवरच आम्हाला टेबल, खुर्च्या टाकून दिल्या. समुद्र किनारा नयनरम्य दिसत होता. मध्यभागी दूरअंतरावर थांबलेल्या बोटी काही काळ दिसल्या. नंतर मात्र त्यांच्यावर असलेला लाईटचा प्रकाश रात्रभर साद घालत होता. डावीकडून उजवीकडे पसरलेला विस्तीर्ण समुद्र आणि त्याच्या लाटा कर्णमधूर वाटत होत्या. उजवीकडच्या वाड्या, वस्त्यांवरचे प्रकाश दिवे खुणावत होते. दूरवर एखादे जहाज दिसत होते. कोकणी मेव्याचा मनसोक्त आस्वाद घेत सागराचे रुप मनात साठवित होतो. रात्री बारा वाजता समुद्र आमच्या पायाशी आला होता.
पहाटे पाचलाच उठलोत. खिडकीतून चंद्राचा सोनेरी प्रकाश समुद्राच्या पाण्यावर हेलकावे घेत होता. विहंगम वाटत होते. काळोखात फोटो काढण्याचा प्रयत्न केला. सकाळी साडेसहा वाजता चांगला फोटो मिळाला. सकाळचा चहा घेऊन बीचवर हुंदडण्याची मज्जा अनुभवली. अनेक माणसे मॉर्निंग वॉक करीत होते. खूप व्हिडीओ आणि फोटो काढले. अंघोळी करुन, नाष्टा करुन दर्शनासाठी वेळणेश्वर मंदिरात गेलो.
वेला म्हणजे समुद्र किनारा. त्या तीरावर असणारा देव, तो वेळणेश्वर. किंवा नवसाला पावायला वेळ न लावणारा म्हणून वेळणेश्वर. बाराव्या शतकाच्या प्रारंभी येथे छोटे मंदिर होते. त्यावेळी त्यास वेळोबा म्हणत. मंदीर आवार खूपच प्रशस्त आहे. दहा मिटर उंचीची दीपमाळ आहे. घुमटाकार शिखराचा सभामंडप, बाहेर पितळी ओटा, त्यावरच चारही बाजूने एकमुखी मुखवटे आणि त्यावर पाच फण्यांचा पितळी नाग आहे. गाभाऱ्यात तीन फुट लांबीची काळ्याशार पाषाणाची शीवपिंड आहे. त्यावर शंकराचा पितळी मुखवटा ठेऊन त्याला पोशाख घालतात. शीवपिंडीवरही पाच फण्यांचा नाग आहे. पिंडीच्या मागे पार्वती आणि गणपतीच्या मूर्ती आहेत. गाभाऱ्याबाहेर कालीमाता, महिषासुरमर्दिनी, गोपाळकृष्ण यांच्या पंच धातुच्या तर विठ्ठल रखुमाईची पाषाण मूर्ती आहे. मुख्य मंदिराला लागूनच श्री काळभैरव, श्री गणपती, श्री लक्ष्मीनारायण यांची मंदिरे आहेत. मंदिर परिसरात एक खोल विहीर आहे. तिचे पाणी अतिशय गोड आहे. त्याला रहाट लावला आहे. पाणी शेंदून पिण्याचा आनंद काही औरच मिळतो.
वेळणेश्वर हे घाग कुटुंबियांचे पुर्वापार ग्रामदैवत आहे. सध्या राजेंद्र घाग प्रमुख मानकरी आहेत. पेशवेकालीन श्री वेळणेश्वर अनेक कुटुंबाचे कुलदैवत आहे. गोखले, गाडगीळ, चापेकर, चाफेकर, आचार्य, कातरणे, बडे, बर्ये, पलुसकर, पाऊलबुध्दे, पुराणिक, मरुकर, मुरुगकर, वैद्य, म्हसकर, शास्त्री, सुतारे, गोवंडे, भातखंडे, सावरकर या कुटुंबामध्ये कुलदैवत म्हणून श्री वेळणेश्वराची पूजा केली जाते. परिसरातील मुख्यमंदिराच्या जीर्णोध्दराचे काम प्रगतीपथावर आहे. तर काही मंदिरे दोन हजार वर्षांपुर्वीची, प्राचीन काळाची साक्ष देत आजही आपले अस्तित्व टिकवून आहेत. वेळणेश्वर मंदिराच्या बाजूने जो डोंगराचा भाग समुद्रात घुसला आहे, त्याला मेरुमंडल असे म्हणतात.
विशेष साैजन्य- जेष्ठ पत्रकार, लेखक
– प्रा. डॉ. बाबा बोराडे
मागील भागात काय वाचलात – निसर्ग फेरफटका…. वेळणेश्वरचे सौंदर्य
श्री धोपेश्वर नयनरम्य परिसर शाहुवाडीच रांगड सौंदर्य
नक्की वाचा; वाचकांसाठी स्पेशल! रांगड सौंदर्य शाहुवाडीचं………. पालेश्वर धरणाचा सौंदर्याचा साज काय येगळाच