वेळणेश्वर गावातून वळणावळणांच्या कच्च्या रस्त्याने वाटचाल सुरु झाली. गुहागर-तवसाळ सागरी रस्त्यावर हेदवी गाव आहे. गावात हरेश्वराचे प्राचीन मंदिर आहे. त्याच्या पुढे एका छोट्या टेकडीवर अतिशय मनोहरी लाल, पांढऱ्या रंगाचे, किल्ल्याच्या तटबंदीसारखे बांधकाम दिसते. हा परिसर आंब्यांच्या बागांनी समृध्द आहे. मंदीर परिसरात जाण्यासाठी काही पायऱ्या आहेत. तर चारचाकी गाडीही अगदी सभामंडपासमोर जाते. अनेक ठिकाणी आंब्याच्या मोहरावर औषधाची फवारणी करताना लोक दिसले. हेदवीचे श्री दशभूज लक्ष्मी गणेश मंदिर, माधवराव पेशव्यांच्या काळात, त्यांच्या मदतीने श्री केळकर स्वामी गणेशभक्त व्यक्तीने हे मंदिर बांधले असावे, असे येथील पुजारी सांगतात.
मंदिरासमोर अतिशय आकर्षक अशी दीपमाळ आहे. बाजूला जयविजय व्दारपाल रुपात दिसतात. सभामंडपात केळकर स्वामींच्या पादुकाही दिसतात. मंदिरातील गणेशमूर्ती संगमरवरी असून डाव्या सोंडेची व दहा हातांची आहे. असे म्हणतात की, पेशवेकाळात केळकर स्वामी नावाच्या गणेशभक्ताला श्रीमंत पेशव्यांच्याबाबतीत वर्तविलेल्या काही घटनांची साक्ष पटल्यामुळे पेशव्यांनी दिलेल्या निधीतून केळकर स्वामींनी हे मंदीर उभारले. मंदिरातील पूर्वाभिमुख श्री गणेशाची मूर्ती काश्मीर येथील पांढऱ्या पाषाणातून घडवलेली आहे. मूर्तीला दहा हात असून, उजव्या बाजूला पहिल्या हातात चक्र, दुसऱ्या हातात त्रिशूळ, तिसऱ्या हातात धनुष्य, चौथ्या हातात गदा व पाचव्या हातात महाळुंग आहे. डाव्या बाजुच्या पहिल्या हातात कमळ, दुसऱ्या हातात पाश, तिसऱ्या हातात नीलकमळ, चौथ्या हातात दात व पाचव्या हातात धान्याची लोंब आहे. गणेश मूर्तीच्या डाव्या मांडीवर अष्टसिध्दीपैकी एक असलेली सिध्दलक्ष्मी बसलेली आहे. मूर्ती डाव्या सोंडेची असून सोंडेत अमृत कुंभ धरलेला आहे. एका मोठ्या आसणावर विराजमान असलेल्या या गणेश मूर्तीची उंची साडेतीन फूट आहे. अशा प्रकारच्या गणेश मूर्तीचे पूजन सैनिकी कामातील व्यक्तीने करणे अभिप्रेत असते, असा संकेत आहे. मंदिर परिसरातले नैसर्गिक वातावरण खूपच आल्हाददायक आहे. स्वच्छता आणि टीपटाप आहे. जंगलाचा आणि झाडाझुडूपाचा परिसर असूनही कोठेही पालापाचोळा, पक्षांची विष्ठा निदर्शनास येत नाही. येथील पाणी खूपच गोड आणि थंडगार आहे. मंदिराच्या खाली भक्त निवास आणि उपाहारगृह आहे. उपाहारगृहातील दांम्पत्य खूपच आपुलकीने आणि आनंदाने पाहुणचार करताना दिसले. येथील बटाटे वडा आणि उसळ पाव स्वादिष्ट आहे.
|