कोल्हापूर : शेतीपंप वीज जोडणीचा ‘पेड पेंडींग’चा प्रश्न मार्गी लावण्यात महावितरणचे कोल्हापूर परिमंडळ राज्यात अग्रेसर ठरले आहे. आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये कोल्हापूर व सांगली जिल्ह्यात एका वर्षात तब्बल 18 हजार 872 शेतीपंपाना वीजजोडणी देऊन राज्यात दुसरे स्थान मिळविले आहे. महावितरणने शेतीक्षेत्राच्या वीजपुरवठ्यासाठी मागील वर्षात सर्वोत्तम कामगिरी केली आहे. ऊर्जामंत्री यांचे निर्देशानुसार शेतीपंपाच्या वीज जोडणी साठी पैसे भरून प्रंलबित प्रतिक्षा यादीतील शेतकऱ्यांचा वीज जोडणीचा प्रश्न सोडविण्यास महावितरणने प्राधान्य दिले. शेतीपंप वीज जोडणीचा नियोजनबध्द कृतीआराखडा तयार करण्यात आला. त्या आराखड्यानुसार आवश्यक निधीची उपलब्धता करून प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली. यासंदर्भातील सातत्यपुर्ण पाठपुराव्याला क्षेत्रीय यंत्रणेने उत्तम प्रतिसाद दिला.
कोल्हापूर मंडळात एका वर्षात 6 हजार 915 शेतीपंपाना वीज जोडणी देण्यात आली आहे. त्यात कोल्हापूर ग्रामीण विभाग क्रं.2 मध्ये सर्वाधिक 2145, कोल्हापूर ग्रामीण विभाग क्रं.1 मध्ये 1961, गडहिंग्लज विभागात 1420, जयसिंगपूर विभागात 1148, इचलकरंजी विभागात 218 व कोल्हापूर शहर विभागात 23 शेतीपंपाना नवीन वीज जोडणी देण्यात आली आहे.
सांगली मंडळात एका वर्षात तब्बल 11 हजार 957 शेतीपंपाना वीज जोडणी देण्यात आली आहे. त्यात कवठेमहांकाळ विभागात सर्वाधिक 4484, विटा विभागात 4201, सांगली ग्रामीण विभागात 2068, इस्लामपूर विभागात 1178, सांगली शहर विभागात 26 शेतीपंपाना नवीन वीज जोडणी देण्यात आली आहे. मार्च 22 पुर्वीच्या पैसे भरून प्रलंबित कोल्हापूर (413), सांगली (1682) शेतीपंप वीजजोडण्या मे 2023 अखेरपर्यंत आणि मार्च 22 नंतरच्या पैसे भरून प्रलंबित कोल्हापूर (1011), सांगली (2736) शेतीपंप वीजजोडण्या शक्य तितक्या लवकर देण्यासाठी महावितरण सर्वोतोपरी प्रयत्नशील आहे.
यापुढे अकृषी वीजजोडण्याप्रमाणे ‘मागेल त्याला वीजजोडणी ’ हे धोरण कृषी क्षेत्रातील वीजजोडण्यासाठी अवलंबण्यात येणार आहे. शेतीपंपाना वीजजोडणी मिळाल्याने शेतकरीवर्गाला दिलासा मिळाला आहे. या कामगिरीबद्दल कोल्हापूर परिमंडळाचे मुख्य अभियंता मा.श्री.परेश भागवत यांनी सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे. वीजग्राहकांना अखंडित, दर्जेदार व सुरळीत वीजपुरवठ्यासाठी सदैव तत्पर राहून ग्राहकसेवेप्रती आपली कटिबध्दता कायम जपावी, असे सुचित केले आहे.