महापुरात युद्धपातळीवर केलेल्या कामाची राष्ट्रीय पातळीवर दखल- मुख्य अभियंता परेश भागवत
कोल्हापूर : मानवाच्या मूलभूत गरजांच्या केंद्रस्थानी वीज आहे. हे जाणून कार्यक्षेत्रात सदैव कार्यमग्न असणारे वीज कर्मचारी, जनमित्र महावितरणचा कणा आहेत. कोल्हापूर,सांगलीच्या जनमित्रांनी महापुराच्या प्रसंगी सुरळीत विजेसाठी युद्धपातळीवर केलेल्या कामाने जगाचे लक्ष वेधले. राष्ट्रीय पातळीवर या कामाची दखल घेतली गेली. कोविड काळात वीज कर्मचाऱ्यांनी केलेले कार्य अफलातून होते,असे प्रतिपादन मुख्य अभियंता परेश भागवत यांनी केले. परिमंडळात आयोजित लाईनमनच्या कौतुक सोहळयाप्रसंगी ते बोलत होते.
केंद्रशासनाने विद्युत क्षेत्रातील लाईनमनच्या कार्याची दखल घेऊन त्यांचे प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दि.०४ मार्च रोजी लाईनमन दिवसाचे आयोजन देशपातळीवर करण्याचे निर्देश दिले. लाईनमन दिवसाच्या औचित्याने महावितरणच्या कोल्हापूर परिमंडळ कार्यालयासह कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील सर्व विभाग, उपविभाग व शाखा कार्यालयस्तरावर लाईनमन कर्मचाऱ्यांचे कौतुकाचा सोहळा उत्साहात व अनोख्या उपक्रमांनी संपन्न झाला. विजेचे कार्य करताना खबरदारी बाळगावी हा सल्ला मान्यवरांनी दिला. ‘आपली सुरक्षा -आपल्या हाती’ या सुरक्षेच्या संदेशाचा व्यापक प्रसार करण्यात आला. सर्व कर्मचाऱ्यांना सुरक्षेची शपथ देण्यात आली.
परिमंडळातील कार्यक्रमास सहाय्यक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) मा.शशिकांत पाटील, अधीक्षक अभियंता मा.अंकुर कावळे, विद्युत निरीक्षक मा. शकील सुतार, कार्यकारी अभियंता अभिजीत सिकनीस,सुनिल शिंदे, सुनिल माने,उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी भुपेंद्र वाघमारे, सहाय्यक विद्युत निरीक्षक श्रीमती नाईक यांची उपस्थिती होती. अधीक्षक अभियंता अंकुर कावळे यांनी लाईनमनच्या कार्याचा गौरव करून बदलत्या गरजांनुसार कार्यक्षमता विस्तारावर भाष्य केले. विद्युत निरीक्षक शकील सुतार यांनी वीज क्षेत्रातील लाईनमनचे योगदान मोलाचे असल्याचे सांगून सुरक्षा नियमांच्या पालनातून विद्युत अपघात रोखणे शक्य असल्याचे सूचित केले. विद्युत सुरक्षेसंदर्भात व्यापक जागृती कार्यक्रम हाती घेण्याची भूमिका विशद केली.याप्रसंगी जनामित्र संदीप शिंदे,अशोक कोळी, मिलिंद कुरतडकर यांनी मनोगते व्यक्त केली. लघु प्रशिक्षण केंद्रप्रमुख रत्नाकर मोहिते यांनी सुरक्षा प्रशिक्षण दिले. प्रास्ताविक उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी मा.भुपेंद्र वाघमारे तर सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी किशोर खोबरे यांनी केले.